शेलसुर येथे रविकांत तुपकरांवर जेसीबीने पुष्पवृष्टी; एल्गार परिवर्तन मेळाव्यानिमित्त गावकऱ्यांकडून जोरदार स्वागत

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची त्वरित नुकसान भरपाई द्या ; तुपकरांची मेळाव्यात मागणी
 
शेलसुर (बुलढाणा लाइव वृत्तसेवा) :एल्गार परिवर्तन मेळाव्या'निमित्त चिखली तालुक्यातील शेलसुर येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. गावातील तरुणांनी एकत्र येऊन रविकांत तुपकर यांच्यावर जेसीबीने पुष्पवृष्टी केली तर गावातून मिरवणूक काढून तुपकरांचे जंगी स्वागत केले. या मेळाव्याला परिसरातील शेतकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र याकडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावून घेतला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकरांनी यावेळी केली
तुपकर
  'एल्गार परिवर्तन मेळाव्या'च्या निमित्ताने शेतकरी नेते रविकांत तुपकर जिल्हा पिंजून काढत आहेत. त्यांच्या मेळाव्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, तरुण व सर्वसामान्यांशी संवाद साधून तुपकर त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. चिखली तालुक्यातील शेलसुर येथील मेळाव्यालाही परिसरातील नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. गावातील तरुणांनी एकत्र येत जेसीबीच्या सहाय्याने रविकांत तुपकर यांच्यावर पुष्पवृष्टी करून व गावातून मोठी मिरवणूक काढून त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढून तसेच दिवे, पणत्या लावून मायमाऊल्यांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर झालेल्या 'एल्गार परिवर्तन मेळाव्या'ला परिसरातील शेतकऱ्यांनी जोरदार प्रतिसाद देत मोठया प्रमाणात उपस्थिती दर्शवली. यावेळी रविकांत तुपकरांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. आपण गेल्या २२ वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी लढत आहोत. माझा हा लढा वैयक्तिक नसून सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि तरुणांसाठीचा लढा आहे, किती संकट आले तरी आपण हा लढा सोडला नाही. आणि यापुढे देखील कितीही गुन्हे दाखल झाले कितीही वेळा जेलमध्ये जाण्याची वेळ आली, तरी आपण मागे हटणार नाही, असा निर्धार देखील यावेळी रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला. गावागावातील तरुणांना तुपकरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहेत. त्याचा प्रत्यय शेलसुरमध्येही बघायला मिळाला.
                  यावेळी राजेंद्र काळे, अॅड. शर्वरी तुपकर, नंदू पालवे, भगवानराव मोरे, विनायक सरनाईक, नितीन राजपूत, भारत वाघमारे, परमेश्वर झगरे, दत्तात्रय जेऊघाले, राहुल शेलार, गजानन देशमुख, अरुण पन्हाळकर, अरुण नेमाने, नवलसिंग मोरे, रवीअण्णा काळे, बंडूसाहेब जेऊघाले, भारत गव्हाणे, अनिल टेकाळे, अतुल तायडे, चेतन कणखर, शेनफडराव धंदर, दिलीप वाघमारे, ज्ञानेश्वर जाधव, मधुकर वाघमारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते व समस्त शेलसुर गावकऱ्यांनी या मेळाव्याचे जोरदार नियोजन केले होते.