आरक्षण नसल्यामुळे समाजाची अवस्था बिकट- जयश्रीताई शेळके!

मराठा समाजाच्या उपोषणास्थळी भेट देऊन केला पाठिंबा जाहीर
 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी बऱ्याच वर्षांपासूनची मागणी आहे. आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजाच्या अनेक मुलांना उच्चशिक्षण घेता येत नाही. त्यांना नोकऱ्या मिळत नाही. त्यामुळे समाजाची अवस्था बिकट झाली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांनी केले.

Jdjjd

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ ८ सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजबांधवांनी येथील डॉ. महाजन हॉस्पिटलसमोर सुरु केलेल्या उपोषणस्थळी भेट देऊन त्यांनी आपला पाठिंबा दिला. जयश्रीताई शेळके म्हणाल्या, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणणे ही आरक्षण लागू करण्यामागची संकल्पना आहे. त्यानुसार मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी समाजबांधवांनी उपोषण सुरु केले आहे. समाज  त्यांच्या योगदानाची नक्कीच जाणीव ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशा प्रमुख मागण्यासाठी हे उपोषण सुरु करण्यात आले आहे. शुक्रवारी सुनील कोल्हे, रावसाहेब देशमुख, अमोल देशमुख, शुभम घोगटे, निलेश सोनुने, ओमप्रकाश बोर्डे यांनी उपोषण सुरु केले. दरम्यान दररोज तालुक्यातील समाजबांधव साखळी उपोषणात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.