जालिंदर बुधवत यांनी तिसऱ्यांदा स्वीकारला बाजार समितीच्या सभापती पदाचा पदभार! म्हणाले, बाजार समितीचा विकासरथ जोमाने पुढे नेणार.!

 

 बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी हिताला प्राधान्य देऊन बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केलेली विकास कामे, नव्याने शोधलेले आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत यामुळे बाजार समिती सध्या सुस्थितीत आहे. हीच स्थिती आगामी काळात भक्कम करून बाजार समितीचा विकासरथ जोमाने पुढे नेणार असल्याची ग्वाही सभापती जालिंदर बुधवत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.  महाविकास आघाडीने बुलढाणा बाजार समितीवर सत्ता स्थापन केली. त्यानंतर आज २५/५/२०२३ शिवसेनेचे (उ बा ठा) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी सभापती पदाचा पदभार स्वीकारला. सोबतच काँग्रेसच्या सौ.आशा नंदकिशोर शिंदे यांनीही उपसभापती पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व संचालक उपस्थित होते. तिसऱ्यांदा सभापती पदाचा पदभार बुधवत यांनी स्वीकारला आहे.  

 कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत बुलढाणा, दुधा, धाड व चांडोळ येथे आगामी काळात करावयाच्या कामांचे नियोजन त्यांनी  बोलून दाखवले. बुलढाणा, दुधा व धाड येथे व्यापारी गाळे तसेच  दुधामध्ये पेट्रोल पंप उभा झाल्याने बाजार समितीच्या आर्थिक उत्पन्नात चांगला हातभार लागला आहे. त्यामुळे बुलढाणा व चांडोळ येथे देखील पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जाणार आहेत. सोबतच चांडोळ येथे उपबाजार,  प्रशस्त गोडाऊन व्यवस्था शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी सुविधा निर्माण करण्याचा आपला मानस असल्याचे जालिंदर बुधवत म्हणाले. त्याचप्रमाणे बुलढाणा येथे आठवडी बाजारात पंचक्रोशीतून येणाऱ्या शेतकऱ्यांचे भाजीपाला ,फळ ठेवण्यासाठी  यासाठी कोल्ड स्टोरेज ची सुविधा नाही. ही सुविधा बुलढाणा बाजार समितीच्या आवारात निर्माण करून शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही याप्रसंगी जालिंदर बुधवत यांनी दिली. 


बाजार समितीच्या सभापती पदावर पुन्हा एकदा आपल्याला काम करण्याची संधी मिळाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळी, मायबाप शेतकऱ्यांचे मी मनोमन आभार मानतो. निवडणुकीतील राजकारण आता बाजूला ठेऊन विकासाचे काम पुन्हा एकदा जोमाने हाती घेणार आहे. यामध्ये सगळ्यांना सोबत घेण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहील. जे सोबत येतील, त्यांना सोबत घेऊ; जे सोबत येणार नाहीत त्यांच्या शिवाय हे काम पुढे नेऊ अशी प्रतिक्रिया नवनियुक्त सभापती जालिंदर बुधवत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी संचालक सुनील तायडे,  शेषराव कानडजे , राजू मुळे, सौ तुळसाबाई माणिकराव खांडवे,  तुळशीराम काळे, अर्चना सुनील सोनुने,  संदीप इंगळे,  संजय दर्डा, हरी सिनकर , लखन  गाडेकर यांच्यासह बाजार समितीचे  सचिव,  सहसचिव व कर्मचारी बांधव उपस्थित होते.