एप्रिल फूल नाही बरं..खर खर सांगतोय! भाजपच्या डोक्यात मिशन बुलडाणा लोकसभा आहेच; केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आज दुसऱ्यांदा जिल्ह्यात; भाजपच्या जिल्हा कोअर कमिटीची घेणार बैठक!

 
bhupendra yadav
चिखली(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आज,१ एप्रिलला बुलडाणा जिल्ह्यात येत आहेत. सकाळी ११ वाजता चिखलीत भाजपच्या जिल्हा कोअर कमिटीची ते बैठक घेत आहेत. वर्षभरावर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी भूपेंद्र यादवांचा हा दौरा असल्याचे समजते. विशेष म्हणजे भाजपच्या केंद्रीय योजनेतून तयार करण्यात आलेल्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत भूपेंद्र यादव यांच्याकडे  बुलडाणा लोकसभेची जबाबदारी देण्यात आली आहे.  याआधी १८ आणि १९ सप्टेंबरला ते बुलडाणा जिल्ह्यात आले होते, तेव्हाच मी पुन्हा पुन्हा येईल आणि पुन्हा पुन्हा भेटेल असे ते पत्रकारांना म्हटले होते.
 

राज्यात शिंदे - फडणवीस सरकार स्थापन होण्याआधीच भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सुरुवात केली होती. सध्या आहे त्या जागा कायम ठेवण्यासोबतच काही नव्या जागा काबीज करण्याचा भाजपचा प्लॅन आहे. त्यात राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघ भाजपच्या अजेंड्यावर आहेत. त्यात सुप्रिया सुळेंचा बारामती आणि खा. प्रतापराव जाधवांच्या बुलडाणा लोकसभा मतदारसंघावरही भाजपची नजर आहे. राज्यात शिंदे - फडणविसांचे सरकार आल्यानंतर आता मिशन लोकसभेचे काय? असा प्रश्न लोकसभेची तयारी करणाऱ्या भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देखील पडला होता. मात्र त्यानंतर १८ आणि १९ सप्टेंबरला भूपेंद्र यादव यांनी बुलडाणा लोकसभा क्षेत्राचा प्रवास केला, त्याआधी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुलडाणा लोकसभेवर आता आपल्याला भाजपचा झेंडा फडकवायचा आहे, भूपेंद्र यादव पुढच्या १८ महिन्यांत ६ वेळा तुमच्याकडे त्यासाठी येणार आहे असे विधान करून आपल्या मनात नेमक काय आहे हे इशाऱ्या इशाऱ्याने सांगून टाकले. लोकसभा निवडणुकीत शिंदेची शिवसेना आणि भाजपा एकत्र लढले तरी सध्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळेलच असे निश्चितपणे सांगता येणार नाही. त्याचे कारण, भाजपकडून करण्यात येत असलेल्या विविध सर्वेक्षणात बुलडाणा लोकसभेची जागा शिंदेच्या शिवसेनेला जड जाण्याचा अहवाल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आहे.  त्यामुळे एक जागा गमावण्यापेक्षा तिथे पर्यायी व्यवस्था उभी करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. खा.जाधवांना राज्यसभा किंवा पूर्वेकडील एखाद्या राज्याचे राज्यपाल पद देऊन,भाजपकडून नव्यादमाच्या आणि कोरी पाटी असलेल्या उमेदवाराला तिकीट देऊन  हा तिढा सोडविण्याचा प्रयत्न भाजप करू शकते.
    
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवांकडे बुलडाणा लोकसभेची जबाबदारी..!
   
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी लोकसभा प्रवास योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. सध्या भाजपच्या ताब्यात नाहीत अशा देशभरातील १४० व महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदारसंघाचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. विविध केंद्रीय मंत्री, राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि संघटनेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना  एक किंवा दोन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुका लागेपर्यंत किमान ६ वेळा मतदारसंघाचा प्रवास करून पक्षासाठी उमेदवाराचा शोध घेणे, केंद्राच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचल्यात की नाही याची पाहणी करणे, आणि केंद्राच्या योजनांचा लाभ सामान्यांना मिळवून देणे आदी कामे त्या पदाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहेत. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे बुलडाणा लोकसभा क्षेत्राची जबाबदारी आहेत. मागील सप्टेंबर महिन्यात केलेल्या प्रवासात त्यांनी लोकसभा क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघात प्रवास केला होता. १९ सप्टेंबरला भाजपच्या जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन त्या दौऱ्यात त्यांनी केले होते. आज, पुन्हा ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून भाजपच्या लोकसभा कोअर टीम मधील नेत्यांना या बैठकीचे निमंत्रण असल्याचे समजते.