१५ वर्षे रंगांचा बेरंग झाला! आता पुढची ५ वर्षे विकासाचे रंग उधळायचेत! संदीप शेळकेंचे प्रतिपादन; सिंदखेडराजा तालुक्यात परिवर्तन रथयात्रा दणक्यात...
Mar 26, 2024, 10:16 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मागच्या १५ वर्षात जिल्ह्याची विकासाच्या बाबतीत वाट लागली. जिल्हा ५० वर्षे मागे गेला.परिवर्तन रथयात्रेदरम्यान मला अनेक मतदार असे भेटले ज्यांनी खासदार पाहिला नाही. गेल्या १५ वर्षात रंगाचा बेरंग झाला मात्र आता पुढची ५ वर्षे विकासाची रंग उधळायचे आहेत असा संकल्प करून मतदान करा असे आवाहन वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी केले. आज,२४ मार्चला होळीच्या दिवशी वन बुलडाणा मिशनच्या परिवर्तन रथयात्रेने सावखेड भोई, भिमगाव, जुमडा, गिरोली बु, निमखेड, गिरोली खु, तुळजापूर या गावांत परिवर्तनाचा जागर केला. यावेळी झालेल्या कॉर्नर सभांमधून संदीप शेळकेंनी विद्यमान खासदारांवर हल्लाबोल केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, वन बुलढाणा मिशन ही चळवळ जेव्हापासून सुरू केली. तेव्हापासून एक गोष्ट जाणवली की, जिल्ह्यातील तरुणांना रोजगार नाही. त्यामुळे ते नेहमी म्हणतात आमच्या हाताला काम द्या, त्यातून एक लक्षात आलं की जिल्ह्याचा शाश्वत विकास करायचा असेल तर आधी तरुणांसाठी रोजगार उभा केला पाहिजे. यासाठीच मी राजकारणात आलो आहे. मला माझ्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, तरुण भावांच्या रोजगाराच्या समस्या दिसतात अशी भावना त्यांनी भाषणातून व्यक्त केली. शेतकऱ्यांविषयी बोलताना ते म्हणाले की, अनेक जण सल्ले देतात शेतकऱ्यांनी असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे,मात्र त्यांनीच आजवर विकसित शेतीसाठी धोरण आखले नाही. याबाबत केंद्रात कधी झगडले नाही. शेतपांदन रस्त्याचा विचार कधी कुणाच्या डोक्यात आला नाही. पांदन रस्ते चांगले असले तर शेतात शेतकरी नवनवे यांत्रिक प्रयोग करू शकतात असे शेळके म्हणाले.
जिल्ह्यात संत्र्याचे उत्पादन, केळीचे उत्पादन भरघोस प्रमाणात मिळू शकतो. इतकी क्षमता जिल्ह्याच्या मातीत आहे, मात्र शेतकऱ्यांना पुरक धोरणे आखावी लागतील. त्यामुळे जनतेने खासदारकीची संधी दिल्यास आपण शेती संबंधित प्रभावी धोरणे राबवणार आहोत. तरुण भावांच्या रोजगारासाठी तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी एमआयडीसी उभारणार आहोत. शेती आणि रोजगार या दोन प्रमुख धोरणांवर काम केलं तर निश्चितपणे जिल्ह्याचा विकास होणार असल्याचे संदीप शेळके म्हणाले.