गोष्ट ग्रामपंचायतीची! भाजपाचा बालेकिल्ला राहिलेल्या अटाळीत यंदा 'कमळ' फुलणार की पुन्हा एकदा 'हातालाच' असणार मतदारांची पसंती? आ. फुंडकरांची प्रतिष्ठा पणाला...

 
Bxbzb
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):भाजपाचा बालेकिल्ला राहिलेल्या अटाळीत यंदा 'कमळ' फुलणार की पुन्हा 'हाताला' असणार मतदारांची पसंती यावर खामगाव तालुक्यात जोरदार चर्चा रंगतांना दिसत आहे. कधीकाळी भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अटाळी ग्रामपंचायतीत यंदा भाजपचीच सत्ता आली पाहिजे यासाठी आमदार आकाश फुंडकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे..
खामगाव तालुक्‍यातील एकूण सहा ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.त्या - त्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. खामगाव तालुक्‍यातील राजकीय दृष्ट्या महत्‍व प्राप्‍त असलेल्‍या अटाळी ग्रामंपचायतीची निवडणूक सुध्दा यामध्ये होणार आहे.अटाळी येथील ग्रामपंचायत सध्या सर्व तालुक्‍यात चर्चेत आहे. राज्‍य निवडणूक आयोगाने जिल्‍ह्यातील ४८ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.यामध्ये खामगाव तालुक्‍यातील जयपूर लांडे, जयरमगड, रोहणा, अटाळी, घारोड, माटरगाव गेरू ग्रामपंचायतींचा समावशे आहे. लोणी गुरव, टाकळी, माक्ता या गावांमध्ये ३ सदस्यपदासाठी पोटनिवडणूक आहे. यामुळे ग्रामीण भागात दिवाळी आधीच राजकीय फटाके फुटणार आहेत. या सहा ग्रामपंचायतपैकी सध्या तालुक्‍यात अटाळी या ग्रामपंचायतीची चर्चा सुरु आहे.मागील निवडणुकीत या ग्रामपंचायतवर काँग्रेस पुरस्‍कृत पॅनलने बाजी मारली होती. यावेळी सत्ता कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.विरोधी गटाला देखील योग्‍य मोर्चेबांधणी करुन आपलाच सरपंच कसा होईल, यासाठी राजकीय गणिते आखावी लागणार आहेत. अटाळी गावाची ओळख ही तालुक्यातील भाजपचा गड म्‍हणून असली तरी मागील निवडणुकीत अंतर्गत राजकीय कुरघोड्यांमुळे भाजपला येथे सत्ता गमवावी लागली होती. ग्रामपंचायत म्हटलं की पक्ष नसतो, असा नागरिकांचा जरी समज असला तरी पक्षीय राजकारणातूनच उमेदवार उभे केले जात असल्‍याचे वास्‍तव आहे.त्यामुळे यंदा कोण बाजी मारेल याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे. 
मागील वेळी विरोधी बाकावर बसलेले म्हणतात!
मागील पाच वर्षांमध्ये गावाला विकासापासून कोसो दूर ठेवण्याचे काम सत्ताधारी लोकांनी केले आहे.त्यामुळे गावातील विविध समस्यांनी डोके वर काढले आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताधिक्य घेऊन भाजप पुरस्कृत उमेदवार निवडून येतील.
सत्ताधाऱ्यांचा दावा!
गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहे. गावातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. मतदार राजा सुज्ञ असून, विचार करुनच मतदान करेल. त्यामुळे आता या निवडणुकीत आमची सत्ता येईल.