गौरवाची बाब! आमदार श्वेताताईंना महाराष्ट्र विधानसभेचा उत्कृष्ट भाषण पुरस्कार! महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते ३ सप्टेंबरला होणार वितरण....

 
Shweta mahaley
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने राज्यभर छाप सोडली आहे. पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या असल्या तरी एका कसलेल्या विधानसभा सदस्यासारखे त्यांनी सभागृह गाजवले. आता केवळ चिखली विधानसभा मतदारसंघासाठीच नव्हे तर संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यासाठी गौरवाची बाब ही की आमदार श्वेताताई महाले यांची राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे सन २०२३ -२०२४ करिता महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी आमदार श्वेताताईंना त्यासंबंधीचे पत्र लिहून माहिती कळवली आहे. ३ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता मुंबईतील विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मा. राष्ट्रपतींच्या हस्ते आमदार श्वेताताईंना उत्कृष्ट भाषण पुरस्कार देण्यात येणार आहे.