Amazon Ad

ठरल! बुलडाण्यात मंगळवारी शासन आपल्या दारी कार्यक्रम! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पवार उपस्थित राहण्याची शक्यता!

२५ हजार लाभार्थ्यांना कार्यक्रमात सहभागी करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न; ३५० एसटी बसेस केल्या बुक! जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त ७० हजार शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू..

 
बुलडाणा(अनिल मंजुळकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  शासन आपल्या दारी उपक्रमात जिल्हास्तरीय कार्यक्रम बुलडाणा येथे मंगळवार, दि.२९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला आहे. परिवहन महामंडळाच्या मागील कऱ्हाडे ले आऊट येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला २५ हजार लाभार्थी उपस्थित राहण्याच्या दृष्टीकोनातून नियोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिली.
 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज,२५ ऑगस्टला  पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी दिनेश गिते, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे आदी उपस्थित होते.

 शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे नियोजन आधी मेहकर येथे करण्यात आले होते.७ ऑगस्ट,१२,१३, १७ अशा विविध तारखा वारंवार बदलण्यात आला. मुख्यमंत्री येणार म्हणून मेहकर, लोणार मध्ये प्रशासन तयारीला देखील लागले होते. मात्र आता मेहकर ऐवजी लोणार येथे कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित रहावेत असा जोरदार प्रयत्न आमदार गायकवाड करीत आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री २९ ऑगस्टला बुलडाण्यात येण्याची शक्यता आहे.

 जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाग्यश्री विसपुते म्हणाल्या की शासनाच्या विविध विभागांसोबत महिला आर्थिक विकास महामंडळ, बचतगटांचा यात सहभाग असणार आहे. आतापर्यंत पाच लाख ७५ हजार लाभार्थ्यांना या अभियानात लाभ देण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या दिवशी आणखी दिड लाख नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. या अभियानात आणखी लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी विविध विभागांकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

कार्यक्रमाच्या नियोजनाची तयारी पूर्ण झाली आहे. परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेमागील जागेत मंडप उभारण्यात येणार आहे. याठिकाणी रोजगार मेळावा, आरोग्य शिबीरासह विविध विभागाच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना आणण्यासाठी ३५० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना डीबीटी, धनादेश, साहित्य वाटप आदी लाभाचे प्रत्यक्ष वाटप करण्यात येणार आहे. त्यासोबत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले ७० हजार शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरू आहेत.

            शासन आपल्या दारी अभियानातून शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती विसपुते यांनी केले.