ठरलं... २८ ऑक्टोबरला चिखलीच्या नगराध्यक्षांचा काँग्रेस प्रवेश!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भाजपने पक्षातून निष्कासित केल्यानंतर चिखलीच्या नगराध्यक्षा सौ. प्रिया बोंद्रे व त्यांचे पती कुणाल बोंद्रे काँग्रेसमध्ये परतणार आहेत. हा पक्षप्रवेश सोहळा भव्य दिव्य करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे. २८ ऑक्टोबर रोजी हा सोहळा होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. १ नगरसेवक, ३ ते ४ पंचायत समिती सदस्य आणि १ जिल्हा परिषद सदस्यसुद्धा काँग्रेसवासी होणार आहेत. यात आणखी वाढ होऊ शकते. कुणाल बोंद्रे यांनीसुद्धा या वृत्ताला दुजोरा दिला असून, प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे ते म्हणाले.
२१ ऑक्टोबर रोजी भाजप शहराध्यक्ष पंडित देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे व कुणाल बोंद्रे यांना पक्षातून निष्काषित केल्याची माहिती दिली. भ्रष्टाचाराचे आरोप करून पक्षातून काढून टाकल्यानंतर लागतीच बोंद्रे दाम्पत्यानेही पत्रकार परिषद घेऊन आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले. कुणाल बोंद्रे पुन्हा काँग्रेसमध्ये परततील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची अधिकृत घोषणा करण्याचे टाळले होते. अखेर बोंद्रे यांचा काँग्रेस प्रवेश ठरला आहे. त्यांच्यासोबत नगरसेवक गोपाल देव्हडे, जिल्हा परिषद सदस्य श्याम पठाडे आणि ३ ते ४ पंचायत समिती सदस्य काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश सोहळा भव्य दिव्य करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले किंवा कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी चिखलीला यावे, असे प्रयत्न काँग्रेसकडून होत आहेत.