'मुहूर्त' ठरला; नवरदेव कोण हे ठरेना? दोन दिवसात चित्र स्पष्ट होण्याची शक्यता! बुलडाणा लोकसभा मतदारसंघात काय चाललंय..वाचा..!

 
बुलडाणा
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. यामुळे खऱ्या अर्थाने महासंग्रामाचे पडघम देखील वाजू लागले. मात्र बुलडाण्यात मुहूर्त ठरला पण नवरदेवांचा अर्थात उमेदवारांचा पत्ता नाही की जागा कोणत्या पक्षाला हे स्पष्ट नाही असे मजेदार चित्र बुलडाणा मतदारसंघात निर्माण झाले आहे.
 २६ एप्रिलचा मुहूर्त ठरला तरी महायुती व आघाडीचा उमेदवार कोण? हा प्रश्न अनुत्तरित आहे. महायुतीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास शिवसेना शिंदे गट, भाजप, आणि उशिरा का होईना अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा बुलडाण्यावर दावा ठोकला आहे. यामुळे युतीत जागा वाटपावरून घमासान सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांच्यानंतरचे प्रबळ नेते समजले जाणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातही यावर तोडगा निघू शकला नाही . आता उद्या परवा दिल्लीत होणाऱ्या बैठकीत यावर तोडगा निघेल अशी शक्यता आहे.
   दुसरीकडे महाविकास आघाडी मध्येही असाच पण दुहेरी घोळ आहे. बुलडाण्यात सतत जिंकणारी शिवसेना (उबाठा) बुलडाणा मतदारसंघ सोडायला अजिबात तयार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच आग्रही असल्याने मित्रपक्षाची पंचायत झाली आहे. मात्र काँग्रेस देखील आपला जुना मतदारसंघ परत घेण्यासाठी आग्रही भूमिकेत आहे.काँग्रेसकडे जयश्री शेळके, श्याम उमाळकर यांच्यासह तब्बल १० इच्छुक आहेत. यामुळे काँग्रेस ने सेनेवरील दवाब वाढवीत आपला आग्रह कायम ठेवला आहे. यामुळे उमेदवारी चा गुंता कायम आहे. यामुळे बुलडाण्याचे चित्र विचित्र झाले आहे.
 
यंदा बहुरंगी लढत?
    बुलडाणा लोकसभा मतदारसंघात १९८९ पासून २०१९ पर्यंतच्या लढती आघाडी विरुद्ध युती अश्या झाल्या. यंदा मुख्य लढत महाविकास आघाडी व महायुती अशी होईल असा आजचा रागरंग आहे. मात्र शेतकरी नेते रविकांत तुपकर व वन बुलडाणा मिशनचे संदीप शेळके हे प्रबळ अपक्ष आणि त्यांना यात्रामध्ये मिळणाऱ्या उत्साही प्रतिसादामुळे निवडणूक बहुरंगी लढतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. परिवर्तन आणि विकास या मुद्यावर हे युवा नेते मैदानात उतरले आहे. त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रस्थापित हादरून गेले आहे. त्यांचा हा 'टेंम्पो' अखेरपर्यंत कायम राहिल्यास आघाडी व युतीसमोर दुहेरी आव्हान उभे ठाकणार हे निश्चित...