आंदोलनाच्या दणक्यामुळेच अवकाळी, गारपीटीची मदत मंजूर; आता श्रेय घेण्यासाठी काही नेते समोर येतील - रविकांत तुपकर

तुपकरांच्या सावळी येथील एल्गार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : - अवकाळी पाऊस आणि गारपीटीची मदत मजूर झाली आहे, निवडणूकीच्या तोंडावर ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, हे आपल्या आंदोलनाचे यश आहे. आंदोलनाच्या दणक्यामुळेच ही मदत मिळणार आहे. मंत्रालय ताबा आंदोलनावेळी या मदतीसंदर्भातचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत दिले होते. तसेच अधिवेशनातही त्यांनी यासंदर्भात घोषणा केली होती. परंतु आता काही नेते याचे श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहे, असे प्रतिपादन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सावळी येथे 'एल्गार परिवर्तन मेळाव्या'त आयोजित सभेत बोलतांना केले.
बुलडाणा
बुलढाणा तालुक्यातील धाड जवळील सावळी येथे १८ फेब्रु. रोजी एल्गार परिवर्तन मेळावा पार पडला. यावेळी तरुणांनी रविकांत तुपकर यांचे जंगी स्वागत करुन बैलगाडीतून मिरवणूक काढली. गावात ठिकठिकाणी तुपकरांचे स्वागत करण्यात आले, महिलांनी औक्षण केले. त्यानंतर आयोजित सभेत शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिक, महिला आणि तरुणांची मोठी गर्दी होती. यावेळी बोलतांना रविकांत तुपकर यांनी सांगितले की, दुष्काळ,अतीवृष्टी आणि गारपीटीची मदत मिळावी यासाठी आपण वारंवार आंदोलने केली आहेत. एल्गार मोर्चानंतर मुंबईतील मंत्रालय ताबा आंदोलनादरम्यान २९ नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत सोयाबीन-कापूस दरवाढ यासह दुष्काळ, अवकाळी व गारपीटीची मदत यासह मागण्या आक्रमकपणे मांडल्या होत्या. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ, अवकाळी व गारपीटीच्या मदतीसंदर्भात शब्द दिला होता व त्यासंदर्भातील सुतोवाच ही त्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केले होते. त्यानुसार आता बुलढाणा जिल्ह्यातील गारपीट व अवकाळी पावसाने बाधित असलेल्या २ लाख ७६ हजार ५७५ शेतकऱ्यांना २२० कोटी ३४ लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे. ही मदत लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली तर त्याचे श्रेय रविकांत तुपकर आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाईल म्हणून ही मदत तातडीने जमा न करता आता निवडणुकीच्या तोंडावर जमा केली जात आहे, मात्र या मदतीसाठी आम्ही केलेली आंदोलने जनता विसरली नाही. त्यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी बोलायला तयार नव्हते आणि आता श्रेय घेण्यासाठी काही जण पुढे येतील पण जनतेला सर्व समजते, आता कुणी कितीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी शेतकऱ्यांना वस्तुस्थिती माहिती आहे, असा घणाघात यावेळी बोलतांना रविकांत तुपकर यांनी केला.
   
      तातडीने मंजूर झालेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, त्याचबरोबर दुष्काळाची मदत व पिकविमाही तातडीने शेतकऱ्यांना द्या, तसेच सोयाबीन-कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये बोनस द्या, अशी मागणी देखील रविकांत तुपकरांनी या मेळाव्यादरम्यान केली.
       
       याप्रसंगी मंचावर रिजवान सौदागर, गजानन लांडे-पाटील, अंकुशराव वाघ, तुळशिरामदादा काळे, डॉ.विनायक वाघ, आकाश माळोदे, प्रभूसेठ वाघ, राजेंद्र नागवे, सदाशिव जाधव, पुरुषोत्तम पालकर, तुळशीराव वाघ, विनायक वाघ, समाधान नागवे, प्रदीप टाकसाळ, दगडू साखरे, गणेश वाघ, अमोल देवकर, प्रकाश सपकाळ, डी.एन. सपकाळ, एकनाथ वाघ, वैभव वाघ, नेहरूसिंग मेहर, राजू धनावत, गोपाल राजपूत, संदीप वाघ, गुलाब जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तर या मेळाव्याचे आयोजन समस्त सावळी गावकऱ्यांनी केले होते व या मेळाव्यासाठी हिंदूधर्मरक्षक ग्रुप सावळी व सुवर्ण गणेश मित्र मंडळाच्या युवकांनी प्रचंड मेहनत घेतली.