ही शोकांतिका नाही का? संदीप शेळके यांचा सवाल! गारडगाव येथील सभेत प्रस्थापित पुढाऱ्यांना धो धो धुतले! खामगाव तालुक्यात परिवर्तन रथयात्रेला भरघोस प्रतिसाद

 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकशाहीने आम्हाला मतदानाचा अधिकार दिला. आमच्या गल्लीचा, गावाचा विचार दिल्लीत व्हावा असे आम्हाला वाटले पण दिल्लीत जाऊन लोकप्रतिनिधींनी त्यांचाच विचार केला. राजकारणाला जनकल्याणाचे साधन मानण्याऐवजी स्वतःच्या स्वार्थाचे साधन मानणाऱ्या लोकप्रतिनिधींना जनता आता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण आता जनतेच्या संयमाचा बांध सुटला आहे. खामगाव, शेगाव परिसर रेल्वेने जोडलेला आहे. मात्र असे असले तरी येथे पाहिजे त्या प्रमाणात औद्योगिक विकास झाला नाही. खामगाव, शेगावचा तरुण पुण्या - मुंबईत रोजगारासाठी कंपनीचे उंबरठे झिजवतो तेव्हा आम्हाला आमच्या लोकप्रतिनिधींची लाज वाटते. इथे आम्ही तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकलो नाही ही शोकांतिका नाही का? असा सवाल वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी उपस्थित केला.वन बुलडाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा सध्या खामगाव तालुक्यात आहे. आज, सकाळी गारडगाव येथे झालेल्या सभेत संदीप शेळके बोलत होते.
 भाषणातून सत्ताधाऱ्यांवर टीकेचा आसूड उगारताना संदीप शेळके म्हणाले की, आजवर जिल्ह्यातील नेत्यांना घाटाखालच्या जनतेने खूप प्रेम दिलं. पण नेत्यांनी त्यांची फसवणूक केली आहे. रस्त्यांचे बांधकाम नाल्यांचे बांधकाम अशी ग्रामपंचायत स्तरावर झालेली कामे सांगून आपण मोठा विकास केला असल्याचे नेते अभिमानानं सांगतात. पण शेतकऱ्यांपुढे ओढावलेले अस्मानी संकट त्यांना कधी दिसत नाही. अतिवृष्टी झाली , नुकसान झालं त्यावेळी शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचून केवळ घोषणा करणे एवढंच पुढाऱ्यांना कळत, प्रत्यक्षात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांप्रती यांना कोणताही कळवला नसल्याचे संदीप शेळके म्हणाले. आता शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी वन बुलडाणा मिशनने पुढाकार घेतला आहे. जनतेने जर संधी दिली तर प्रत्येकाच्या शेताच्या बांधावर पाणी आणि तालुक्याला एमआयडीसी आणल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद संदीप शेळके यांनी बोलून दाखविला. मुळात जिल्ह्यातील नेत्यांना आजवर विकास म्हणजे काय हेच कळाले नाही. मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याला गौरवशाली वारसा लाभला असतानाही पर्यटनाच्या दृष्टीने, रोजगाराच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांनी आजवर विचार केला नाही असेही संदीप शेळके म्हणाले.
   
ही शोकांतिका नाही का? 
आता येणारी लोकसभा निवडणूक जिल्ह्याचा भाग्योदय घडवणारी असणार आहे . राजकारणाला मिशन समजून आपण काम करत असून जनतेने संधी दिल्यास खासदार म्हणून नव्हे तर लोकसेवक म्हणून काम करणार असल्याचा निर्धार यावेळी शेळके यांनी बोलून दाखवला. खामगाव तालुक्यात अनेक समस्या आहेत, खामगाव रेल्वेशी जोडलेले असूनदेखील इथे पाहिजे त्या प्रमाणात आद्योगिक विकास झाला नाही, एवढं सगळ असताना इथल्या तरुणांना जर पुण्या मुंबईत नोकरी शोधावी लागत असेल तर ही शोकांतिका नाही का? असा सवाल शेळके यांनी उपस्थित केला. आता आपला विकास आपल्या हाती आहे. जिल्ह्यात परिवर्तनाच्या माध्यमातून विकासाची गंगा आणायची आहे, नदीजोड प्रकल्प, प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी, उच्च दर्जाचे शिक्षण, महिला सक्षमीकरण, सिंचनाची सोय या गोष्टी आपल्या अजेंड्यावर असल्याचे संदीप शेळके म्हणाले.
  खामगाव तालुक्यात भरभक्कम प्रतिसाद..!
 वन बुलडाणा मिशनच्या परिवर्तन रथयात्रेला खामगाव तालुक्यात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. खामगावात झालेला महिला मेळावा अभूतपूर्व ठरला होता. त्यानंतर आज, ४ मार्चला सकाळी गारडगाव, हिवरखेड, लोखंडा, घारोड, लाखनवाडा, शिरला, आंबेटाकळी, अटाळी, विहिगाव, रामनगर या गावांत परिवर्तन रथयात्रेचे दमदार स्वागत झाले. यावेळी झालेल्या दमदार सभा परिवर्तनाचे संकेत देणाऱ्या ठरल्या.