BIG BREAKING खरचं की काय? विजयराज शिंदे पुन्हा मातोश्रीच्या वाटेवर? मातोश्रीवरून प्रवेशाला ग्रीन सिग्नल पण...

 
वस
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): साडेतीन - चार वर्षांपूर्वी व्हाया वंचित मार्गे भाजपात आलेल्या विजयराज शिंदेंची राजकीय अस्वस्थता चांगलीच वाढली आहे. अर्थात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे तसे होणे महत्त्वकांक्षी नेत्याचे लक्षण आहे. शिंदेंना ही अस्वस्थता स्वस्थ बसू देत नसल्याने ते आता पुन्हा घरवापसी करण्याच्या इराद्यात असल्याचे अतिशय खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. माजी आमदार विजयराज शिंदे पुन्हा उबाठा शिवसेनेत प्रवेश करू शकतात. त्या दृष्टीने काही महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी - गाठी त्यांनी घेतल्याचे सांगण्यात येत असून मातोश्री वरून देखील ग्रीन सिग्नल मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शिंदेंचे अद्यापही तळ्यात मळ्यात चालू असल्याने ठोस निर्णय त्यांनी घेतलेला नाही..तिकडून ठोस शब्द मिळाल्यास विजयराज शिंदे देखील ठोस निर्णय घेऊ शकतात..
  बुलडाणा विधानसभेचे ३ वेळा प्रतिनिधित्व करणारे विजयराज शिंदे १० वर्षांपासून सत्तेपासून दूर आहेत. २०१९ ला प्रतापराव जाधव यांनी संजय गायकवाडांच्या गळ्यात तिकीटाची माळ टाकल्याने दुखावलेल्या शिंदेंनी वंचितची वाट धरली. दुसऱ्या क्रमांकाची मते घेणाऱ्या शिंदेंनी वर्षभरातच भाजपात प्रवेश केला. अर्थात त्याला त्यावेळी असलेली राजकीय परिस्थिती कारणीभूत होती. खा प्रतापराव जाधव,आ.गायकवाड त्यावेळी महाविकास आघाडीचे घटक असल्याने भाजपात स्कोप मिळेल असे शिंदेंना वाटले होते. भाजपात आल्या आल्या वर्षभराच्या काळात त्यांनी चांगलाच गाजवला. मात्र पुन्हा राजकीय समीकरणे बदलली, खा.जाधव आणि आ.गायकवाड एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याने आणि एकनाथ शिंदे पुन्हा भाजपात आल्याने शिंदेंचा चांगलाच हिरमोड झाला. वेळोवेळी त्यांची नाराजी बाहेर आली. लोकसभा भाजपला सुटेल या आशेपोटी ते भाजपात होते पण उरलीसुरली ती आशाही संपली. भाजपला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने महायुती म्हणून लढणे भाजपची देखील राजकीय गरज बनली आहे. त्यामुळे बुलडाणा विधानसभेवर महायुतीकडून पहिला अधिकार शिवसेनेचा अर्थात आ.संजय गायकवाड यांचाच आहे. त्यामुळे विजयराज शिंदेंचे राजकीय भविष्य काय? असा प्रश्न राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे. या प्रश्नाचे उत्तर सोडवण्यासाठी आता विजयराज शिंदेंनी देखील हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र मातोश्री वरून ठोस शब्द मिळाल्यानंतरच शिंदे अंतिम निर्णय घेऊ शकतात.