अपक्ष उमेदवार संदीप शेळकेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क !

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) अपक्ष उमेदवार तथा वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास सुंदरखेड येथील मतदान केंद्रावर सपत्नीक मतदान केले. 
 बुलढाणा लोकसभा मतदार संघासाठी आज २६ एप्रिलला मतदान होत आहे. संदीप शेळके अपक्षरित्या लोकसभा निवडणूक रिंगणात आहेत. यापूर्वी संदीप शेळके यांनी प्रचारात मुसंडी घेतली होती. विकासाचे व्हिजन मांडून त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला होता. निवडणूक विभागाकडून त्यांना कॅमेरा हे चिन्ह मिळाले आहे. आज सकाळी सुंदरखेड येथील मतदान केंद्रावर शेळकेंनी मतदान केले. याप्रसंगी त्यांच्यासह राजश्री शाहू मल्टीस्टेटच्या अध्यक्षा मालती शेळके उपस्थित होत्या. यावेळी माध्यमांशी बोलताना शेळके म्हणाले की, भारतीय लोकशाहीचे सर्वात मोठे पर्व म्हणजे लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आहे. जिल्ह्याच्या, देशाच्या विकासासाठी मी मतदान केले, आपण देखील आवर्जून मतदान करा असे आवाहन संदीप शेळके यांनी केले. याआधी नेहमीच मतदानाचा हक्क बजावला आहे, परंतु उमेदवार असताना पहिल्यांदाच मतदान केल्याने खूप आनंद होतोय. असेही शेळके म्हणाले.