चिखलीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे राजकारण पेटणार! महाविकास आघाडीचे आज बाजार समितीला घेराव आंदोलन;

अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येऊन निवडणुकीसाठी आवश्यक कागदपत्रे द्यायला टाळाटाळ करीत असल्याचा आरोप; अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

 
चिखली( राहुल रिंढे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत असलेल्या चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीचे राजकारण चांगलीच पेटण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी आज,३ एप्रिलला कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाला घेराव घालणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहेत. आमची कोणतीही थकबाकी नसतांना ते नोड्युल (ना- देय) प्रमाणपत्र द्यायला टाळाटाळ करीत आहेत, जेणेकरून आमची उमेदवारी बाद करण्याचा अधिकाऱ्यांचा डाव आहे असा आरोप महाविकास आघाडीकडून निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या कशिनाथआप्पा बोंद्रे यांनी केलाय. काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंनी शनिवारी या घेराव आंदोलनाची घोषणा केली होती.
 

आज ,३ एप्रिलला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून दुपारी ३ पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे चिखलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाच्या परिसरात चांगलाच राडा होण्याची चिन्हे आहेत. आम्ही वारंवार कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाला विनंती केली, निवेदने दिली मात्र त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही. आमच्याकडे कोणती थकबाकी आहे ते तरी कळवा असेही  पत्र बाजार समिती प्रशासनाला दिले मात्र त्यांच्याकडून उत्तर आले नाही. शेवटी बाजार समितीच्या खात्यात ६ लाख रुपये आरटीजीअस केले, त्या रकमेतून आमच्याकडे जर थकबाकी असेल तर ती काढून घ्या असेही पत्र दिले मात्र बाजार समितीचे अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून आम्हाला उत्तर देत नाहीत. आमचेच पैसे त्यांच्याकडे आहेत मात्र तरीही ते नोड्युल द्यायला तयार नाही. पराभवाची कुणकुण लागल्याने हे असले प्रकार सुरू आहेत असे काशिनाथ बोंद्रे म्हणाले. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली असून  प्रशासनाच्या हुकूमशाहीच्या विरोधात आजचे घेराव आंदोलन असल्याचे बोंद्रे म्हणाले.