वासनिकांसमक्ष नानाभाऊंनी काँग्रेस नेत्यांना धू-धू धुतले! राहुलभाऊंच्या चुकीमुळेच श्वेताताई आमदार!

राहुल बोंद्रे म्हणाले, काँग्रेस पक्षावर आपला पूर्ण विश्वास, सोडून जाण्याचा विचारही मनात येणार नाही..! आमदार श्वेताताई म्हणाल्या...
 
lkfj

राजेंद्र काळे:

आत्ताच श्वेताताईंनी त्यांची वासनिक साहेबांप्रती बालपणीची आठवण सांगितली. मुकुलजी सोबत असणार्‍या कौटुंबीक संबंधाचा फायदाही मला चिखली विधानसभेत झाल्याचेही त्या बोलून गेल्या. पण राहुलभाऊ खरं सांगू- श्वेताताईंना मिळालेली आमदारकी ही तुमची चूक आहे. तुम्ही ट्रॅक बदलला, अन् त्या ट्रॅकवर आल्या.. पक्षात काम करतांना नेत्यांवर निष्ठा अन् कार्यकर्त्यांवर विश्वास हवा. आत्ताच रविकांत तुपकर बोलून गेले. वासनिक साहेबांच्या नेतृत्वातून नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना खूपकाही शिकायला मिळते. इतरांसाठी प्रेरणादायी असणारे मुकुलजींचे नेतृत्व काँग्रेसमधील नेत्यांना कळत नाही का? काय नाही दिले वासनिकांनी इथल्या नेत्यांना?? मात्र ज्यांना मिळाले त्यांच्यापेक्षा ज्यांना काहीच नाही मिळाले, ते त्यांच्याप्रती जास्त ‘लॉयल’ राहीले..

खा.मुकुल वासनिक मंचावर असतांनाच, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नानाभाऊ गावंडे ‘हे’ सर्व बोलत होते.. अन् खालून त्याच्या प्रत्येक वाक्याला टाळ्या पडत होत्या, नेत्यांच्या टाळक्यात लगावली जात आहे.. याचा आनंद कार्यकर्त्यांना होत होता. निमित्त होत, शनिवार २० मे रोजी बुलढाण्यात झालेल्या ‘राठोड डायग्नोस्टीक्स’च्या कार्यक्रमाचे!
यात नानाभाऊंच्या निदानांनी अनेक निनाद घडले!!

आ.सौ.श्वेताताई महालेंनी भाषणात चवथीत लोणारला मामाच्या गावी शिकत असतांनाची आठवण सांगितली. मामा डॉ.खुशालराव मापारी हे वासनिक साहेबांचे कट्टर कार्यकर्ते, मुकुलजी घरी जेवायला येणार म्हणून दिवसभर त्यादिवशी घरात दिवाळीसारखे वातावरण होते. मामांच्या त्या कौटुंबीक संबंधाचा फायदा चिखलीत विजयासाठी मला झाल्याचेही सांगतांना ‘तो कसा हे राहुलभाऊंना विचारा’ असा टोलाही जाता-जाता लगावला.

नेमका श्वेताताईंच्या भाषणाचा हाच धागा नानाभाऊंनी पकडला. राहुलभाऊंकडे पाहून त्यांनी श्वेताताई ह्या आमदार असल्याची तुमचीच चूक असल्याचे सांगितले. तुम्ही त्यावेळी ट्रॅकवर नव्हता, पक्षावरचा विश्वास ढळला की पराभव होतो. तोच तुमचा झाला. काय नाही दिले वासनिक साहेबांनी या जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना? धृपदराव सावळे अपक्ष निवडून येवूनही त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष केले होते. एक-एक माणूस जोडण्याची ती कला होती. त्यातूनच पुढे धृपदराव आमदार झाले. राहुलभाऊ बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ तर आता राजेश ऐकडे हे मुकुलजींमुळेच आमदार होवू शकले. विजय सावळेंना त्यावेळी नागपूर विद्यापीठात अध्यक्ष केले होते, संजय राठोडला एनएसयुआय.चे प्रदेश अध्यक्ष, मनिषा पवार यांना वयाच्या २५व्या वर्षी जिल्हा परिषद अध्यक्ष, अलकाताई खंडारे अन् कितीतरी जणांना अध्यक्ष बनवून नेतृत्व बनवत पुढे आणले. अशी कितीतरी नावं आहेत. काहीही न घेता सर्वकाही देण्याची भूमिका वासनिकांनी या जिल्ह्यात घेतली. २००४ ला या जिल्ह्यातून शेवटची निवडणूक लढले. पण तरीही गत २० वर्षात या जिल्ह्यातून कोणतीही मतं घ्यायची नसतांनाही, ते देशपातळीवर काम करतांना सातत्याने बुलडाणा जिल्ह्याच्या संपर्कात असतात. आजही तुम्ही देशात कुठेही जा, बुलडाणा जिल्ह्याचे सांगितलेतर तुमची राहण्या-खाण्याची सर्व व्यवस्था केल्या जाते ती मुकुल वासनिक या नावामुळे. जिल्ह्यातील सुख-दु:खात अजूनही मुकुलजी धावून येतात, अगदी साधारण कार्यकर्त्यांच्या घरीही लग्नात म्हणा की सांत्वनपर भेटीला येतात. एवढं करणार्‍या या माणसासाठी या जिल्ह्यातील ज्यांना खूप काही मिळाले, त्या नेत्यांनी काय केले? पण तरीही या माणसाने नाळ तुटू दिली नाही. नेतृत्वावर निष्ठा व कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवण्याचे भान प्रत्येक नेत्याला असले पाहिजे, अशी रोखठोक भूमिका मांडून नानाभाऊंनी व्यक्त होणार्‍या भावनांना रोखत पुर्णविराम दिला.

यानंतर अध्यक्षीय भाषणात राहुल बोंद्रे काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष होते. आपला ट्रॅक चुकला होता, याची कबुली देत मात्र आपले डॉक्टर हे मुकुल वासनिक हेच असल्याचे सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासून आता ‘ऑपरेशन’ सुरु झाल्याचे त्यांनी सांगत येत्या विधानसभेचेही ऑपरेशन सक्सेसपुल करणार असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस पक्षावर आपला पुर्ण विश्वास असून तो सोडून जाण्याचा विचारही यापुढे मनात येणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. सुजातपूरला साखर कारखान्याच्या जागेवर चॅरीटी हॉस्पीटल उभारणीचे काम हळूहळू सुरु करणार असल्याच्या संजय राठोड यांच्या वक्तव्यावर त्यांनी ‘हर्षवर्धन सपकाळांच्या घरासारखे हळू-हळू का? अशी फिरकी घेतली. रुग्णालयासाठी अनुराधा परिवारातर्फे राहुलभाऊ काहीतरी जाहीर करण्याची अपेक्षा असतांना, त्यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थितच काय पण पत्रिकेतही नाव नसणार्‍या हर्षवर्धन सपकाळांना संजय राठोडांचा ‘जीवश्च-कंठश्च’ मित्र संबोधून मध्ये का आणले? हे मात्र समजू शकले नाही.

अर्थात मंचावर झालेल्या या राजकारणाचा कुठेही उल्लेख खा. मुकुल वासनिक यांनी भाषणातून केला नाही. जिजाऊ जन्मस्थळ विकासासाठी व जिल्ह्यासाठी कशी कशी आंदोलनात्मक भूमिका घेत गेलो, याचा गोषवारा त्यांनी घेतला. मणिपूरच्या हिंसाचाराची माहिती घेण्यासाठी काँग्रेसचे त्रिसदस्यीय दल इन्फालला गेले होते, काल रात्रीच दिल्लीला परतलो. आज बँगलोरला कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी जायचे होते. पण विचार केला संजय राठोडांचा राग न परवडण्यासारखा आहे, म्हणून सर्व कार्यक्रम सोडून बुलडाण्याला आलो असल्याचेही त्यांनी सांगताच हशा पिकला!