"ते" जर आज आमदार असते तर आणखी एक खोक्यावाला वाढला असता! आमदार डॉ. शिंगणेंचा शशिकांत खेडेकरांवर निशाणा! देऊळगावमहीत ६ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन,७ कोटींच्या कामांचे लोकार्पण!

आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लोकांसाठी जगायचे! आ. डॉ. शिंगणेंचा शब्द

 

देऊळगावमही( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  राज्यातले सरकारचे काही खरे नाही. राज्यात जे घडलय ते सर्वसामान्य जनतेला रुचले नाही. कोर्टात प्रकरण चालू आहे. त्यामुळे राज्य सरकारचे काय होईल हे सांगता येत नाही. अशा अस्वस्थ वातावरणात  मागील निवडणुकीत मतदारसंघातील जनतेने त्यांना "माजी" करून टाकले त्यांना आता "आजी" झाल्यासारखे वाटत आहे.

आपणच आमदार, मंत्री  झाल्याच्या थाटात ते वावरत आहेत. ते जर आज आमदार असते तर आणखी एक खोक्यावाला वाढला असता असा टोला माजी मंत्री  आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी लगावला. आ.डॉ.शिंगणे यांच्या हस्ते देऊळगाव मही येथे ६ कोटी रुपयांच्या विकासकांमांचा भूमिपूजन व ७ कोटी रुपयांच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला, यावेळी आ. डॉ शिंगणे बोलत होते. माजी आमदार काही अधिकाऱ्यांना मीच पुढचा आमदार असल्याचा सांगतात, माझ्या अधिकारील भूमिपूजन ते करतात, कुठेही नारळ फोडतात..

भूमिपूजन कार्यक्रमाची पत्रिका ते छापत नाहीत कारण पत्रिका छापल्यास आपले पितळ उघडे पडेल अशी भीती त्यांना वाटते असेही यावेळी डॉ.शिंगणे म्हणाले. सत्ता असो वा नसो आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करायचे ठरवले आहे.  सध्या विरोधी पक्षात असलो तरी मतदारसंघाच्या विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही असा शब्दही डॉ.शिंगणे यांनी यावेळी दिला.

पुढे बोलतांना आ. डॉ.शिंगणे म्हणाले की, देऊळगाव मही गावात विकासाच्या दृष्टीने अनेक संस्था वाढत आहे, विकासाची कामे चालू असतात. स्व.भास्कररावजी शिंगणे यांचा राजकीय उदय याच गावातून झाला अशी आठवण यावेळी डॉ.शिंगणे यांनी सांगितली. मला नेहमी या परिसराने सहकार्य केले,लोकसभा निवडणूक व पाचव्यांदा विधानसभेत पोहचत असताना देऊळगाव मही गावाने जे दिले ते मी कधीही विसरू शकत नाही.  विकासाची कामे करतांना आपण कधी भेदभाव केला नाही. ज्या गावात दोन आकडी मते मिळाली नाहीत त्या गावातही विकासकामे होत आहेत.सत्ता येत जात असते, कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही. मी सुद्धा लोकसभेत दोनदा पराभूत झालो..मात्र लोकप्रतिनिधी असलेल्या व्यक्तीने कधीही भेदभाव करायचा नसतो हेच लोकप्रतिनिधीचे काम असल्याचे ते म्हणाले.

आतापर्यंत ७ निवडणुका लढल्या. काही मिळवण्यासाठी या क्षेत्रात आलो नाही. आमदार मंत्री होऊ हा विचार स्वप्नातही केला नव्हता.राजकीय दृष्ट्या काहीच मिळवायचं नाही मात्र आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लोकांसाठी काम करण्याचा संकल्प केला असल्याचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले.