काही झाले तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री होऊ देणार नाही! आमदार संजय गायकवाडांनी स्पष्टच सांगितलं..
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्य सरकारमध्ये अजित पवारांची एन्ट्री झाल्याने अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. ज्या अजित पवारांचे कारण सांगून , ते निधी देत नसल्याचा आरोप करून एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी बंड केले तेच अजित पवार आता सत्तेत परतले आहेत. एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या आमदारांचा विरोध असताना सुद्धा अजित पवारांकडे अर्थखाते देण्यात आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदार अस्वस्थ आहेत. दरम्यान विविध वक्तव्यांनी सातत्याने चर्चेत असणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष आहे, त्यामुळे पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
आमदार संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या उठावात सहभागी होताना जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यावरही आरोप केले होते. पालकमंत्री निधी वाटपात दुजाभाव करीत असल्याचा आरोप त्यावेळी आमदार गायकवाडांनी केला होता.दरम्यान जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे आता जवळपास अजितपवारांच्या गोटात सामील झाले आहेत. "डॉ. राजेंद्र शिंगणे यांना आता मंत्रिपद मिळाले आणि त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले तर तुम्हाला ते मान्य असेल का?" असा प्रश्न आमदार संजय गायकवाड यांना आज एका पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावेळी " काही झाले तरी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पालकमंत्री होऊ देणार नाही" अशी भूमिका आमदार गायकवाड यांनी स्पष्ट केली. जिल्ह्यात शिवसेनेचे २ आणि भाजपचे ३ आमदार आहेत त्यामुळे १ आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद मिळू देणार नसल्याचे आमदार संजय गायकवाड म्हणाले.