लोकसभा निवडणुकीत महाविजय मिळवायचाय! कार्यकर्त्यांनो सज्ज व्हा; आमदार श्वेताताईंचे आवाहन! आज स्वतः पेठ गावात करणार बूथ सशक्तीकरणाचे काम...

 
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): येणारी लोकसभा निवडणूक देशाचे भाग्य बदलवणारी व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर तिसऱ्यांदा शिक्कामोर्तब करणारी ठरेल, त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच कंबर कसून कामाला लागावे व या महाविजयाचे वाटेकरी व्हावे असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी केले. भाजपचे " गाव चलो " अभियान चिखली मतदारसंघात राबवण्यासंदर्भात काल, ७ फेब्रुवारी रोजी अंबिका अर्बन पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार राज्यातील प्रत्येक मतदारसंघात " गाव चलो " अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत चिखली विधानसभा मतदारसंघात देखील या अभियानाचे आयोजन आमदार श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे. मतदारसंघातील प्रत्येक बुथवर हे अभियान राबवले जाणार असून तेथील बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, बुथ समिती तसेच स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून बूथ सशक्तिकरण करण्यात येईल. या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जात यश संपादन कसे करता येईल यावर या कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात आली. 
आ. श्वेताताई महाले देणार पेठ गावात भेट
         भाजपच्या " गाव चलो " अभियानांतर्गत कशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी प्रभावी काम करावे याबाबत आ. श्वेताताई महाले यांनी त्यांच्या भाषणातून मार्गदर्शन केले. स्वतः आमदार श्वेताताई आज,८ फेब्रुवारीला चिखली विधानसभा मतदारसंघातील पेठ या गावात दिवसभर राहणार असून तिथे त्या बूथ सशक्ति करणासाठी आवश्यक ते काम करणार आहेत. आ. महाले पेठ गावात दिवसभर गावातील भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ समितीचे सदस्य यांच्याशी भेटणार असून बुथ सशक्तीकरणासंदर्भात त्यांच्याशी हितगुज करणार आहेत. याशिवाय स्थानिक आशा सेविका, अंगणवाडी सेविका, रेशन दुकानदार, पोलीस पाटील, ग्राम सोसायटीचे अध्यक्ष व संचालक, मुख्याध्यापक, बीट जमदार, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेविका, कृषी सहाय्यक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महावितरणचे लाईनमन, सांस्कृतिक मंडळ, क्रीडा मंडळ, भजनी मंडळ, गणेशोत्सव व दुर्गा मंडळाचे सदस्य आदींच्या भेटी घेऊन विकासाची गंगा गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी काय काय उपाययोजना करता येतील त्या संदर्भात संवाद साधणार आहेत.