मला दिवाळीला कपडे नको...भाऊ आमच्या सोयाबीनला भाव मिळवून द्या! चौथ्या वर्गातील आयुष्यचे रविकांत तुपकरांना भावनिक पत्र; एल्गार मोर्चासाठी दिले दोन हजार रुपये..!!
सोयाबीन - कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सध्या रविकांत तुपकर 'एल्गार रथयात्रे'च्या माध्यमातून जिल्हाभर फिरत आहेत. मेहकर तालुक्यातील नायगाव देशमुख येथे रविकांत तुपकर यांची सभा झाली होती. या सभेला गावातील शेतकऱ्यांसोबत गोपाल सुरडकर हे शेतकरी व त्यांचा इयत्ता चौथीतील मुलगा आयुष देखील उपस्थित होता. रविकांत तुपकर यांनी मांडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचे एकंदरीत भाषण या दोन्ही बापलेकांना मोठे प्रभावित करून गेले. त्यानंतर सभा संपवून रविकांत तुपकर त्या गावातून समोर निघून गेले. दरम्यान ११ नोव्हेंबर रोजी रविकांत तुपकरांच्या पत्नी ॲड. शर्वरी तुपकर यांना गोपाल सुरडकर यांनी फोन करून चिमुकल्या आयुषने रविकांत तुपकर यांच्यासाठी लिहिलेलं पत्र व त्यासोबत ॲड. शर्वरी तुपकर यांच्या फोनपेवर गोपाल सुरडकर यांनी २००१ रुपये देखील पाठविले. हे पत्र वाचून शर्वरी तुपकर यांच्या डोळ्यातून आपसूकच अश्रू तरऴले. माझ्या वडिलांकडे चार एकर शेती आहे. यावर्षी आमच्याकडे पाऊस कमी पडल्यामुळे चार एकरात १३ पोते सोयाबीन झाली. दरवर्षी माझे बाबा मला दिवाळीला नवीन कपडे आणि खाऊ आणतात. यावर्षी कपडे आणि खाऊ घेण्यासाठी त्यांनी चार एकर सोयाबीन मार्केटला विकायला नेली. मी त्यांच्यासोबत होतो, माझ्या बापाने रात्रंदिवस कबाड कष्ट करून मेहनत करून पिकवलेल्या सोयाबीनला ४३५० रुपये भाव मिळाला. तो भाव माझ्या बाबांनी ठरवला नाही, दुसरे लोक आले त्यांनी भाव ठरवला आणि सोयाबीन घेऊन गेले. मी बाबांना विचारले की सोयाबीन तुम्ही पिकवले तर तुम्ही भाव का ठरवला नाही तर बाबा म्हणाले बाळा तू अजून लहान आहे सरकारचे धोरण तुला करणार नाही. ते पैसे घेऊन आम्ही नवीन कपडे घेण्यासाठी दुकानात गेलो, पण दुकानात गेल्यावर मी बाबांना म्हटले.. यावर्षी मला नवीन कपडे न घेता त्या कपड्याचे पैसे मला द्या. मी ते पैसे तुमच्या सोयाबीन- कापसाच्या भावासाठी लढणाऱ्या रविकांतभाऊ तुपकर यांना देणार आहे ते आपल्याला भाव मिळवून देतील. सरकारसोबत भांडतील व कोणते धोरण आहे ते बदलतील. बाबांनी फक्त जे आतापर्यंत मला कळले नाही ते तुला कळलं,असे शब्द बोलून ते पैसे माझ्या हातात दिले. रविकांत भाऊ तुम्ही माझ्या बाबाच्या सोयाबीनला भाव मिळवून द्या, माझ्या कपड्याचे व खाऊचे पैसे मी तुम्हाला २० तारखेच्या सोयाबीन-कापूस एल्गार मोर्चासाठी पाठवत आहे. सोयाबीनचे भाव वाढले की मी नवीन कपडे घेईल व तुम्हाला भेटायला येईल.... असे या पत्रात नमूद आहे. इयत्ता चौथीतील मुलाने लिहिलेले हे पत्र भावनिक असले, तरी रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला दहा हत्तीचं बळ देणार ठरले आहे. आंदोलन एकट्या रविकांत तुपकर यांचे नसून शेतकरी, शेतमजुर, शेतकरी पुत्रांच्या हक्काची ही लढाई असल्याचे आता दिसून येत आहे. गावगाड्यातील शेतकऱ्यांसोबत तरुण तसेच शाळकरी मुले देखील आता रविकांत तुपकरांची भाषा बोलू लागले आहेत. त्यामुळे यंदाचे आंदोलन सरकारला हादरा देणारे असेल असे संकेत दिसून येत आहेत.
`गायत्री´ने दिले आर्थिक बळ
शेतकऱ्यांचा लढवय्या नेता रविकांत तुपकर यांच्या एल्गार रथयात्रेला गावोगावी अगदी तळागाळातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये तरुण,तरुणी देखील मागे नाहीत. साखळी बु. गावातील गजानन देशमुख यांची मुलगी गायत्री देशमुख ही इंजिनिअरिंगच शिक्षण घेत आहे. ती वडिलांसह एक दिवस रथयात्रेत सहभागी झाली. या रथयात्रेला आणि आंदोलनाला प्रत्यक्ष उपस्थिती लावून तिने समर्थन तर दिलेच सोबतच एल्गार रथ यात्रेसाठी 10 हजार रुपयांची मदत देत आर्थिक पाठबळ देखील दिले. गेल्या काही महिन्यांपासून हळूहळू करून तिने ही रक्कम जमा केली असल्याचे तिने सांगत शेतकरी आंदोलनाला हातभार लागल्याने ही रक्कम सार्थकी लागल्याचे तिने सांगितले.