रविकांत तुपकरांची संपत्ती किती? उत्पन्नाचा स्रोत काय? शिक्षण किती? वाचा निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात तुपकरांनी काय लिहिलंय...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज मोठ्या जल्लोषात उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हाभरातून हजारो शेतकरी, तरुण, बेरोजगार, शहरी नागरिक यावेळी उपस्थित होते. ४ एकरवाला असली शेतकरी विरुद्ध कोट्यावधी रुपयांच्या शेकडो एकर जमिनीचा मालक असलेला नकली भूमिपुत्र अशी ही लढाई असल्याचा आरोप यावेळी रविकांत तुपकर यांनी केला. दरम्यान रविकांत तुपकर यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचे विवरण दिले आहे. याशिवाय तुपकर यांच्यावर दाखल असलेले गुन्हे, तुपकर यांचे  शिक्षण, उत्पन्नाचा स्रोत याविषयीची माहिती शपथपत्रात नमूद आहे. शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार रविकांत तुपकर यांच्याकडे जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळून १६ लाख ३६ हजार २८१ रुपयांची संपत्ती आहे. तुपकर यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी ॲड.शर्वरी तुपकर यांची परिस्थिती जरा बरी आहे. ॲड.शर्वरी तुपकर यांच्याकडे जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळून ७६ लाख ९९ हजार रुपयांची संपत्ती आहे. पती पत्नी दोघे मिळून तुपकर दांपत्याकडे   ९३ लाख ३५ हजार  ८९५ रुपये   रुपयांची  संपत्ती आहे.

  शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार रविकांत तुपकर यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथून बीए ची पदवी मिळवली आहे. तुपकर यांनी त्यांच्या संपत्तीचा स्रोत शेती तर तुपकर यांच्य पत्नी शर्वरी तुपकर यांनी वकिली व्यवसाय दाखवला आहे. रविकांत तुपकर यांच्या नावावर कोणतेही वाहन नाही तर शर्वरी तुपकर यांच्या नावावर एक ॲक्टिव्हा, तुपकर यांना लोकवर्गणीतून मिळालेली इनोव्हा व एक महिंद्रा कंपनीची बोलेरो कार आहे. तुपकर यांचे वार्षिक उत्पन्न ७ लाख ४४ हजार २७५ रुपये तर शर्वरी तुपकर यांचे वार्षिक उत्पन्न ४ लाख ९१ हजार २८० रुपये असल्याचे शपथपत्रात त्यांनी नमूद आहे.  रविकांत तुपकर यांच्याकडे २ एप्रिलच्या तारखेत २ लाख रुपयांची कॅश तर शर्वरी तुपकर यांच्याकडे ५० हजार रुपयांची कॅश आहे.

 रविकांत तुपकर यांच्याकडे हातातील ५ हजार रुपयांचे चांदीचे कडे तर शर्वरी तुपकर यांच्याकडे सोन्याची अंगठी मंगळसूत्र कानातले, बांगड्या आणि मोरणी असे ३ लाख ५३ हजार रुपयांचे दागिने आहेत.

खात्यात किती पैसे?

रविकांत तुपकर यांच्याकडे युनियन बँकेच्या खात्यात १२२६ रुपये, एसबीआयच्या खात्यात २१२४ रुपये, बँक ऑफ इंडियाच्या खात्यात १५१६ रुपये, जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या खात्यात २२५ रुपये तर आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात २१ हजार रुपये आहेत.

शेती किती?

रविकांत तुपकर यांच्याकडे सावळा  शिवारात दोन गटांत एकूण ४ एकर २० गुंठे एवढी शेती आहे, जी तुपकर  यांना वडिलोपार्जित मिळाली आहे, त्या शेतजमिनीची आजच्या बाजारभावाने किंमत १४ लाख रुपये एवढी आहे. ॲड. शर्वरी तुपकर यांच्याकडे वारसा हक्काने मिळालेला प्लॉट, सुंदरखेड हद्दीत १ गाळा आहे.

कर्जबाजारी तुपकर...

रविकांत तुपकर यांच्यावर युनियन बँकेचे २ लाख ५० हजार रुपयांचे पीककर्ज आहे. ॲड शर्वरी तुपकर यांच्यावर एचडीएफसी बँकेचे ७ लाख १५ हजार रुपये तर एका पतसंस्थेचे ७ लाख २५ हजार असे एकूण १४ लाख ४० हजार रुपये कर्ज आहे.

गुन्हे नव्हे अलंकार...

रविकांत तुपकर सातत्याने शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आंदोलन करीत असतात त्यामुळे त्यांच्यावर आतापर्यंत शेकडो गुन्हे दाखल झालेले आहेत. अनेकदा तुपकर भाषणात बोलताना आपल्यावर दाखल झालेले हे गुन्हे हे आपले भूषण, अलंकार असल्याचे सांगत असतात. तुपकर यांच्यावरील १०० पेक्षा अधिक गुन्हे निकाली निघाले असून सध्या त्यांच्यावर १२ गुन्हे प्रलंबित आहेत.