नरेंद्र मोदींच्या हवेत विरोधक कितपत टिकणार ? खा. प्रतापराव जाधव चौथ्यांदा विजयाच्या उंबरठ्यावर! यंदा "भूमिपुत्राला" केंद्रीय मंत्रीपद मिळण्याची शक्यता!

देशहिताचा मुद्दा डोळ्यासमोर येऊन मतदार पोहचत आहेत मतदान केंद्रावर...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देव, देश आणि धर्म रक्षणाची जबाबदारी उचलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा केंद्रातील सत्तेत विराजमान करण्याची मानसिकता जनमानसात बसल्याचे चित्र आहे. त्यामुळे राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवूनच मतदारराजा मतदान केंद्रावर पोहचत असल्याचे आहे. १० वर्षाआधीचे काँग्रेसच्या नेतृत्वातील संपुआ सरकार आणि अलीकडच्या १० वर्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार याचे सुस्पष्ट आकलन मतदारराजाने केल्याने ४ जूनचा निकाल ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघापूरते बोलायचे झाल्यास इथे ३ वेळा निर्विवाद वर्चस्व ठेवणाऱ्या प्रतापराव जाधवांचा विजयाचा मार्ग सुकर आणि मोकळा झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. महायुतीने जोरदार ताकद खा.जाधव यांच्या विजयासाठी लावली आहे, त्याची परिणीती निकालात दिसण्याची शक्यता आहे.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात खासदार प्रतापराव जाधव सलग तीन वेळा चढत्या आणि विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. अलीकडच्या १० वर्षात खासदार जाधव सत्ताधारी पक्षाचा भाग असल्याने गत ५० वर्षात झाली नाहीत तेवढे विकास कामे खासदार जाधव यांनी केली आहेत. हजारो कोटी रुपयांचा निधी मतदार संघात आणला आहे. केंद्राच्या विकास योजना काय असतात याचा अनुभव जिल्हावासियांनी घेतला आहे. विशेष म्हणजे यावेळेस खा. प्रतापराव जाधव यांना केंद्रात मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खा.प्रतापराव जाधव पहिल्या फळीतील नेते आहेत, त्यामुळे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील तेव्हा त्यात मंत्री म्हणून बुलढाण्याच्या या भूमिपुत्राचाही समावेश असण्याची शक्यता दहापटींनी वाढली आहे. या सगळ्याच बाबी खा.प्रतापराव जाधव यांच्यासाठी अनुकूल आहेत.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत , जे विधानसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. सर्वच आमदार खासदार जाधव यांच्या विजयासाठी झटत आहेत, आज मतदानाच्या दिवशी देखील सर्वच आमदार आपापल्या मतदारसंघातील आढावा घेत असून सगळीकडेच खा.जाधव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहेत. देशहित, राष्ट्रहित सर्वतोपरी मानून मतदारराजा खा.जाधव यांना चौथ्यांदा दिल्लीत जाण्यासाठी आशीर्वाद देत असल्याचे चित्र आहे..अर्थात याची अधिकृत घोषणा ४ जूनला होणार आहे.