SPECIAL REPORT एल्गार रथ यात्रेचा मुक्काम कसा असतो? कार्यकर्त्यांच्या जेवणाची व्यवस्था कोण करतं ? एल्गार रथयात्रेदरम्यान रविकांत तुपकर किती तास झोपतात...

 
Jkff
  बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी - शेतमजुरांच्या न्याय मागण्यासाठी रविकांत तुपकर यांनी एल्गार रथयात्रा काढली आहे. ५ नोव्हेंबर पासून संत नगरी शेगावातून सुरू झालेली ही रथयात्रा २० नोव्हेंबरला बुलडाणा येथे पोहचणार आहे , तिथे या रथयात्रेचे एल्गार महामोर्चात रूपांतर होणार आहे. एल्गार रथयात्रेच्या माध्यमातून रविकांत तुपकर गावोगावी जावून शेतकऱ्यांना २० नोव्हेंबरच्या एल्गार महामोर्चाचे आवतन देत आहेत, ५ नोव्हेंबरपासून रविकांत तुपकर त्यांच्या घरी गेले नाहीत, दिवाळीचा सणही त्यांनी रथयात्रेतच साजरा केला. भाऊबीजेला तुपकर यांच्या भगिनी तुपकर यांना ओवाळण्यासाठी रथयात्रेतच पोहचल्या..दिवसाची सुरूवात झाल्यावर एल्गार रथयात्रेला सुरुवात होते, रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक गावात तुपकर जमलेल्या शेतकऱ्यांच्या सभेला संबोधित करताना, पुन्हा दुसऱ्या गावाचा प्रवास सुरू होतो...दुपारी जेवणाची वेळ वगळता प्रवास, सभा अन् गावोगावच्या शेतकऱ्यांच्या अडचणी तुपकर जाणून घेतात...कितीही पूर्वनियोजन केलं तरी रथयात्रेला मिळणारा उस्फुर्त प्रतिसाद, प्रत्येक गावात शेतकऱ्यांकडून होणारे स्वागत यामुळे रथयात्रेला मुक्कामाच्या ठिकाणी पोहचायला रात्री कधी १२ तर कधी १ वाजतो, एवढ्या उशीराही मुक्कामाच्या ठिकाणी होणाऱ्या सभेसाठी हजारो शेतकरी उपस्थित असतात ..सभा आटोपल्यावर, दुसऱ्या दिवसाचे नियोजन, आलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा अन् त्यानंतर तास - दीड तास विश्रांती आणि पुन्हा साडेपाचला जागरण करून दुसऱ्या दिवसाच्या रथयात्रेला प्रारंभ...अशी ही रथयात्रा ५ नोव्हेंबरपासून अविरत सुरू आहे..१६ नोव्हेंबर च्या रात्रीचा मुक्काम "टीम बुलडाणा लाइव्ह" ने या एल्गार रथयात्रेच केला..त्याचा हा वृत्तांत..!!
 १६ नोव्हेंबर यात्रेचा १२ वा दिवस होता. सकाळी मोताळा तालुक्यातील हणवतखेड गावातून रथयात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर गोतमारा, कुऱ्हा, कोऱ्हाळा बाजार,खेर्डी, पान्हेरा, सारोळा मारोती, पोफळी, चावर्दा, पंप्री गवळी, माकोडी, शेलगाव बाजार, सावरगाव निपाणा, आव्हा, लिव्हा, पिंपळगाव देवी, धामणगाव बढे या गावांत एल्गार रथयात्रा पोहचली. दिवसभरात १७ सभांना रविकांत तुपकरांनी संबोधित केले. धामणगाव बढे येथे शेवटची सभा ८ वाजता होणार होती, मात्र सभेला सुरुवात व्हायला दोन तास उशीर झाला तरी हजारो शेतकरी रविकांत तुपकर यांची वाट पहात सभास्थळी जमलेले होते. रविकांत तुपकर सभास्थळी पोहचल्या पोहचल्या त्यांनी थेट माईकचा ताबा घेतला, ना कुठले हार तुरे ..ना स्वागत सत्कार, थेट त्यांनी भाषणाला सुरुवात केली.."रोम जळत असताना रोमचा राजा बिगुल वाजवत बसला होता, त्याप्रमाणे आता राज्यातील जनता दुष्काळात होरपळत असताना राज्य सरकार मात्र सत्तेच्या मस्तीत आहे..सरकारचा माज उतरवावा लागेल." असे रविकांत तुपकर म्हणाले. सोयाबीन कापसाची शेती यंदा कशी तोट्यात आहेत हे तुपकर यांनी आकडेवारी सांगून पटवून दिले, सोयाबीन कापसाच्या भाववाढीसाठीचा हा लढा आहे, तुमच्या पदरात काही ना काही पडल्याशिवाय हा पठ्ठ्या स्वस्थ बसणार नाही असेही रविकांत तुपकर यावेळी म्हणाले. दिवसभरात १६ सभा झालेल्या असताना दिवसाच्या शेवटच्या सभेतही तुपकर तब्बल ५५ मिनिटे बोलले.." भाऊ तुम्हाला मानावं लागलं" असं एल्गार रथयात्रेत सोबत असणारे कार्यकर्ते तुपकर यांना म्हणताना दिसत होते...
  गावकऱ्यांनी केली जेवणाची व्यवस्था..
  
 एल्गार रथयात्रा जिथे जिथे पोहचते तिथे तिथे गावकरी लोकवर्गणी करून जेवणाची व्यवस्था करतात. काल, १६ नोव्हेंबरचा रात्रीचा मुक्काम मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली येथे होता. धामणगाव बढे येथील सभा आटोपून एल्गार रथयात्रा सिंदखेड लपाली येथील मुक्कामाचे ठिकाण असलेल्या ग्रामपंचायत अध्ययन केंद्रात रात्री १२ च्या सुमारास पोहचली. स्थानिक शेतकऱ्यांनी मिरची भाजी आणि वाफवलेल्या बिट्ट्या असे रुचकर जेवण बनवलेले होते. तुपकर यांनी कार्यकर्त्यांसोबत जेवण घेतले..त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या नियोजनाची बैठक आणि भेटायला आलेल्या गावागावातील शेतकऱ्यांच्या भेटीगाठी असा हा कार्यक्रम रात्री ३ पर्यंत चालला. त्यानंतर विश्रांती ..आणि पुन्हा ५ वाजता जागरण करून दुसऱ्या दिवसाच्या यात्रेला आज, १७ नोव्हेंबरच्या सकाळी प्रारंभ झाला..!!