बुलडाण्यात मावळ्यांच्या हातातील तुतारी झाकणाऱ्या निवडणूक आयोगाच्या नजरेतून "हे" कसे सुटले? चिखलीत प्रवेशद्वारावर पेटलेली मशाल..!

 
चिखली (ऋषी भोपळे: बुलडाणा लाईव्ह वृत्तसेवा) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागूआहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर लगेच निवडणूक आयोगाकडून पक्ष्यांचे बॅनर, भूमिपूजनाच्या पाट्या झाकण्यात आल्या. बुलढाणा छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक आहे. तिथे स्मारकाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मावळ्यांच्या हातातील तुताऱ्या झाकण्यात आल्या, तुतारी हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे चिन्ह आहे असे कारण निवडणूक आयोगाकडून देण्यात आले. बुलढाणा शहरात ठिकठिकाणी लावलेल्या प्राण्यांच्या पुतळ्यामधून हत्तीचा पुतळा देखील झाकण्यात आला.हत्ती हे बसपाचे चिन्ह असल्याचे कारण यावेळी देण्यात आले. मात्र एवढी बारीक नजर असलेल्या निवडणूक आयोगाच्या नजरेतून चिखलीतील कमानीवर दोन्ही बाजूंनी लावलेली पेटती मशाल सुटली कशी? असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बुलढाणा मार्गे चिखली शहरात प्रवेश करताच मोठे प्रवेशद्वार आहे. त्यावर पेटती मशाल उघडपणे दिसत आहे. सवना फाट्यानजीक चिखली नगरपालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रवेशद्वार उभारले आहे. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चिन्ह असलेली पेटती मशाल आहे. दरम्यान निवडणुक काळाच्या अंतिम टप्प्यात देखील एखाद्या पक्षाचे चिन्ह सार्वजनिक ठिकाणी लागून आहे. त्यामुळे बेरकी नजर असलेल्या निवडणूक आयोगाच्या हे ध्यानात केव्हा येईल ? असा सवाल उपस्थित होतोय.