मोदींचे पक्के शत्रू शिंदेंचे "दोस्त' कसे?; भाजपा कार्यकर्त्यांत नाराजी!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शिवसेनेतून वंचित बहुजन आघाडी आणि काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षात दाखल झालेल्या विजयराज शिंदे यांना आल्या आल्या पक्षानेही योग्य सन्मान देत थेट प्रदेश सरचिटणीसपदी बसवले. पण शिंदेंनी आज या पक्षावर सडकून टीका करणाऱ्या प्रवीण तोगडियांची संगत केल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपातील सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. नरेंद्र मोदींचे सध्या पक्के शत्रू मानले जाणाऱ्या तोगडियांशी शिंदेंनी केलेली ही दोस्ती भाजपातील अनेकांना रूचलेली नसल्याचे दिसून येत आहे. शिंदेंच्या या भूमिकेवर भाजपातूनच नाराजी वाढली आहे.
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राजकीय कारकिर्दीला लागलेले ग्रहण भाजपातील प्रवेशामुळे संपले. पण याच पक्षाच्या विरोधकांशी हातमिळवणी करण्याचा शिंदेंचा उद्देश नक्की काय, हा प्रश्न आता भाजपा कार्यकर्ते खासगीत विचारू लागले आहेत. संस्थापक शिवसैनिक, तालुकाप्रमुख, नगरसेवक ते आमदार अशी विजयराज शिंदे यांची राजकीय वाटचाल राहिली आहे. अपयशाला सलग दोनदा ते सामोरे गेलेले आहेत. त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा भाजपात प्रवेशानंतर रूंदावल्या आहेत.
थेट लोकसभेची निवडणूक लढण्याची त्यांची तयारी सुरू असल्याचे कार्यकर्ते खासगीत बोलून दाखवतात. पण एकूणच भाजपातील वातावरण बघता हे तितकेसे सोपे नाही, हे तेही जाणून आहेत. खासदारकीसाठी भाजपाकडे अनेक चेहरे आहेत. दुसरीकडे बुलडाणा विधानसभा मतदारसंघातही योगेंद्र गोडे यांच्या रूपाने भाजपाची तयारी सुरू आहे. त्यामुळे आशेचा किरण दिसत नसल्याने शिंदे थेट विरोधकांशी तर हातमिळवणी करत नाहीत ना, अशी मिश्किल चर्चा कार्यकर्त्यांत आज सुरू होती.
आज पूर्वाश्रमीचे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रविण तोगडिया बुलडाण्यात होते. दिवसभर शिंदे हे तोगडियांच्या सावली सारखे सोबत होते. राष्ट्रीय बजरंग दलाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना तोगडियांनी मार्गदर्शन केले. त्याही कार्यक्रमात शिंदेंची व्यासपीठावर उपस्थिती होती. तोगडियांनी घेतलेल्या पत्रपरिषदेतही शिंदे होते. त्यानंतर तोगडिया हे शिंदेंच्या घरीही गेले. दुसरीकडे प्रविण तोगडियांनी राष्ट्रीय बजरंग दलाच्या कार्यक्रमात, पत्रकार परिषदेत भाजप आणि मोदी यांच्यावरील आरोप आणि टीकांचे सत्र कायम ठेवले. कठोर शब्दांत मोदींवर त्यांनी तोंडसुख घेतले. त्यानंतर शिंदे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी तोगडिया यांच्या भेटीसाठी विजयराज शिंदे यांच्या घरी गर्दी केल्याचे दिसून आले.
दुसरी बाजू...
शिंदे नुकतेच भाजपात आलेले असल्याने तोगडिया व मोदींच्या संबंधाबद्दल तसेच संघ परिवाराच्या अंतर्गत विषयांबद्दल त्यांना फारसे माहित नसल्यामुळे कदाचित त्यांची फजिती झाली असावी, असेही मत काहींनी मांडले. पण इतकी वर्षे राजकारणात काढलेल्या शिंदेंना ही बाब माहीत नसावी, याबद्दलही शंका व्यक्त होत आहे. विश्व हिंदू परिषदेशी संघटनात्मक मुद्यांवरून मतभेद झाल्यानंतर तोगडियांनी स्वतंत्र आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची स्थापना केली होती. विश्व हिंदू परिषदेतून बाहेर पडल्यानंतर ते उघडपणे मोदींवर टीका करत होते. तोगडियांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर सडकून टीका केली. ७०० शेतकऱ्यांच्या बळींचे पाप मोदींनी केले, असा वार त्यांनी केला. कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणवला जाणारा शिवसेना काँग्रेससोबत गेला यावर तोगडिया म्हणाले, की भाजपा पाकिस्तानी मनोवृत्तीच्या महबूबा मुफ्ती यांच्यासोबत युती करू शकतो. भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये मुफ्ती देशभक्त होतात मात्र प्रविण तोगडिया देशद्रोही होतात. शिवसेना कोणत्याही पक्षासोबत गेली तरी ते खरे देशभक्त आहेत, असेही तोगडिया म्हणाले. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपातील सर्व हिंदू माझे आहेत, असे तोगडिया म्हणाले.