खळबळ उडवली अन् फोन बंद केला! हर्षवर्धन सपकाळ, नॉट रिचेबल...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे संकेत देऊन माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी एकच खळबळ उडवून दिली. दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टमुळे राजकीय वातावरण गरम झाले असतांनाच सपकाळ यांचा फोन बंद येत असल्याने विविध चर्चांना ऊत आला आहे.
 हर्षवर्धन सपकाळ आधीपासूनच काँग्रेसला ही जागा सुटावी यासाठी आग्रही होते. मात्र उबाठा शिवसेनेने नरेंद्र खेडेकर यांची उमेदवारी जाहीर केली. नरेंद्र खेडेकर एकीकडे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची मोट बांधण्याचे काम करीत असताना सपकाळ यांच्या भूमिकेमुळे काँगेस कार्यकर्ते कन्फ्युज आहेत. दरम्यान आज दुपारी सपकाळ यांनी एक्स या मायक्रो ब्लॉगिंग साइटवर पोस्ट करून उमेदवारीचे संकेत दिले, बुलडाणा लाइव्ह ने त्यासंबंधीचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हाभर एकच खळबळ उडाली. दरम्यान आज दुपारी बुलडाण्यात महाविकास आघाडीचा मेळावा होत असताना अनेक नेत्यांनी सपकाळ यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुपारचे "ते" वृत्त व्हायरल झाल्यावर सपकाळ यांनी फोन बंद करून ठेवला. आता सपकाळ यांची मनधरणी करण्यात नरेंद्र खेडेकर यांना कितपत यश येते याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागून आहेत.