पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा रविकांत तुपकरांच्या आंदोलनावर निशाणा! म्हणाले, मी अनेक आंदोलने केली पण, नौटंकी केली नाही...

 
hfgj
जळगाव( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी काल, ११ फेब्रुवारी रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांच्या वेशात येऊन अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तीन तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून तुपकर यांना ताब्यात घेतले. तुपकर यांच्यासह जवळपास २५ जणांविरुद्ध पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तुपकर यांच्या आंदोलनाची खिल्ली उडविली आहे. 

 ९६०० रुपये कापसाला भाव असताना शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या भावात चढउतार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांचा भंग झाला आहे. मात्र तरीसुद्धा हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, आगामी कॅबिनेट बैठकीत कापसाच्या बाबतीत शासनाने काहीतरी वेगळा निर्णय घ्यावा अशी मागणी करणार असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.

दरम्यान बुलडाण्यात तुपकरांच्या आंदोलनावर लाठीचार्ज करणे योग्य आहे का? असा सवाल पत्रकारांनी केला असता गुलाबराव पाटील म्हणाले की, लाठीचार्ज करणे एकदम चूक आहे पण अतिरेक करणे चुकीचे आहे. आंदोलन करायला बरेच मार्ग आहेत. मी सुद्धा अनेक आंदोलने केले पण नौटंकी आंदोलन मला पसंत नाही असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी तुपकरांच्या आंदोलनाची खिल्ली उडवली.