रविकांत तुपकरांची शिष्ठमंडळासमवेत पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या सोबत सोयाबीन-कापूस प्रश्नी चर्चा!

मदतीचा निर्णय लवकर घ्या, अन्यथा २९ नोव्हेंबरला शेतकरी मंत्रालयाचा ताबा घेणारच! तुपकर आंदोलनावर ठाम; म्हणाले,एल्गार महामोर्चा ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है...
 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याचे सहकार मंत्री तथा बुलडाण्याचे पालकमंत्री ना.दिलीप वळसे पाटील व शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यात २३ नोव्हेंबर रोजी सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी आ.डॉ.राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील व पोलीस अधीक्षक सुनील कडासने उपस्थित होते. लवकरच सरकार सोबत बैठक घेवून शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक तोडगा काढू, अशी ग्वाही यावेळी ना.दिलीप वळसे पाटील यांनी रविकांत तुपकर यांना दिली. सरकारने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती पालकमंत्री ना.वळसे पाटील यांच्याकडे आहे. जर सरकारने सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या बाबतीत ठोस निर्णय घेतले नाही तर २९ नोव्हेंबरला हजारो शेतकरी मंत्रालयाचा ताबा घेतील, आंदोलनावर आम्ही ठाम असल्याचे तुपकर यांनी सांगितले.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दिलीप वळसे पाटील आज बुलडाणा येथे आले असता शासकीय विश्रामगृह येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर व शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि समस्या मांडल्या. शेतकऱ्यांच्या मनात सरकारविरोधी असलेला तीव्र रोष यावेळी त्यांनी ना.वळसे पाटील यांच्या लक्षात आणून दिला. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत, शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली. जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री ना.वळसे-पाटील व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा सिंदखेडराजा मतदारसंघाचे विद्यमान आमदार ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी रविकांत तुपकरांकडून शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्यांची सविस्तर माहिती घेऊन सकारात्मक चर्चा केली. लवकरच सरकार सोबत बैठक बोलावून त्यामध्ये सकारात्मक चर्चा घडवून आणली जाईल, अशी ग्वाही यावेळी ना.वळसे-पाटील यांनी रविकांत तुपकर यांना दिली. 
शासनाने सोयाबीन-कापूस दरवाढ, दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट एकरी १० हजार रु. मदत व अन्य मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असे तुपकरांसह शिष्ठमंडळाने पालकमंत्री ना.वळसे-पाटीलांना सांगितले.
       
  २८ नोव्हेंबर पर्यँत सरकारने ठोस निर्णय घेतले नाही तर २९ नोव्हेंबरला हजारो शेतकरी मंत्रालयाचा ताबा घेतील, आंदोलनावर आम्ही ठाम आहोत, असे तुपकरांनी सांगितले. सोयाबीन कापूस-उत्पादक शेतकरी आता एकवटला आहे. बुलढाणा जिल्ह्यात 'एल्गार रथयात्रे'ला मिळालेला तुफान प्रतिसाद व २० नोव्हेंबर रोजी निघालेला रेकॉर्डब्रेक एल्गार महामोर्चा हे ट्रेलर होते. आता आरपारची लढाई मुंबईत होईल, असा इशारा देखील तुपकरांनी दिला आहे.