बुलडाण्यात महायुतीचा जंगी मेळावा! आ.डॉ.शिंगणे म्हणाले,आता संभ्रम दुर, खा.जाधवांना चौथ्यांदा संसदेत पाठवण्यासाठी कामाला भिडा;

जिल्ह्यात पुढच्या ५ वर्षात मोठे उद्योगधंदे आणणार असल्याचा खा. जाधवांचा शब्द! आ.कुटे म्हणाले, खा.प्रतापराव जाधव १ नंबरवर...

 
भेडिये
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खा.प्रतापराव जाधव यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर सर्व संभ्रम दुर झाले आहेत. देशहित आणि राज्याचे हित डोळ्यासमोर ठेवून आपले वरिष्ठ नेते एकत्रित आले आहेत. त्यामुळे आता कार्यकर्त्यांचे देखील मनोमिलन झाले आहे. २ एप्रिलला अर्ज भरण्याच्या दिवशीच आपल्याला महायुतीचे उमेदवार खा.प्रतापराव जाधव यांचा विजय निश्चित करून त्यांना चौथ्यांदा संसदेत पाठवायचा संकल्प करायचा आहे असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केले. बुलडाणा शहरातील धाड नाका परिसरातील ओंकार लॉन्स वर आज,२९ एप्रिलला महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर खा.प्रतापराव जाधव, आ.संजय कुटे, आ.संजय गायकवाड, माजी आमदार धृपदराव सावळे,भाजप नेते योगेंद्र गोडे, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी उपस्थित होते.
भेदिये
  पुढे बोलतांना आ.डॉ.शिंगणे म्हणाले की, आम्ही अनेक वर्षे एकमेकांच्या विरोधात लढलो.वरचे नेते एकत्र आलेत, आता कार्यकर्ते सुद्धा एकत्र झाले पाहिजे यासाठी हा कार्यकर्ता संवाद मेळावा आहे. महायुतीच्या घटकपक्षातील कार्यकर्त्यांच्या मनोमीलनाचा हा कार्यक्रम असल्याचे डॉ.शिंगणे म्हणाले. ताकाला जायचं आणि भांड लपवायचे हा माझा स्वभाव नाही. या सरकारमध्ये सहभागी होतांना मी माझी भूमिका स्पष्ट केली होती. जिल्हा सहकारी बँकेला मदत होणार असेल तर आपण अजित दादांसोबत जाऊ असा निर्णय आपण घेतला होता. महायुतीच्या सरकारने जिल्हा सहकारी बँकेला ३०० कोटी रुपयांची मदत केली. दिलेल्या शब्दाला जागणारे सरकार सध्या राज्यात आणि केंद्रात असल्याचे आ.डॉ. शिंगणे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने करेल. आपण आतापर्यंत स्थानिक पातळीवर एकमेकांच्या विरोधात लढलो पण आता आपण महायुतीचा भाग आहोत. अबकी बार ४०० पार मध्ये बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचा खासदार असला पाहिजे असेही आ.डॉ.शिंगणे शेवटी म्हणाले.
पुढच्या ५ वर्षात मोठे उद्योगधंदे आणणार: खा.प्रतापराव जाधव
यावेळी बोलतांना चौथ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल खा.जाधव यांनी महायुतीच्या नेत्यांचे आभार मानले. पहिली ५ वर्षे विरोधात असल्याने निधी मिळत नव्हता. मात्र २०१४ मध्ये एनडीए सरकार आल्यानंतर जिल्ह्यात मोठमोठी कामे झाल्याचे ते म्हणाले. २०१४ च्या आधीचा जिल्हा आणि आताचा जिल्हा याचे अवलोकन केल्यावर फरक लक्षात येईल. जिल्ह्यातील सर्व महत्वाचे रस्ते चकाचक झाले. सिंचनासाठी जिगाव प्रकल्पासह अन्य सिंचनाची कामे करण्यासाठी साडेसहा हजार कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने दिल्याचे खा.जाधव म्हणाले. संसदेचे अधिवेशन , केंद्राच्या विविध समित्यांच्या बैठका,वेगवेगळ्या राज्यांत प्रवास यात खूप वेळ जातो, त्यामुळे आमदारांना जेव्हढा संपर्कासाठी वेळ मिळतो तेवढा खासदारांना मिळत नाही. मात्र तरीही प्रामाणिकपणे अधिकाधिक वेळ संपर्कासाठी देण्याचा प्रयत्न केल्याचे खा.जाधव म्हणाले. केंद्र सरकारने अनेक विकासकामे केली, पुढच्या दोन वर्षात भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असे ते म्हणाले. विकास जादूच्या कांडीने होत नसतो तर त्यासाठी दूरदृष्टी लागते ,ती दूरदृष्टी नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे असे खा.जाधव म्हणाले. पुढच्या ५ वर्षात अनेक मोठमोठे उद्योग आपल्या जिल्ह्यात येऊ शकतात, त्याचे कारण समृध्दी महामार्ग असल्याचे ते म्हणाले. आता दळणवळणाची सुविधा झाली आहे,त्यामुळे मोठमोठे उद्योग पुढच्या काळात जिल्ह्यात आणणार असल्याचे ते म्हणाले. गेल्या तीन लोकसभा निवडणुकांत मतदारांनी भरभरून मतदान केले, याही निवडणुकीत देशहितासाठी मतदानरुपी आशीर्वाद देण्याची विनंती खा.जाधव यांनी केली.
खा.प्रतापराव जाधव १ नंबरवर: आ.संजय कुटे
यावेळी बोलतांना आमदार संजय कुटे म्हणाले की,खासदार प्रतापराव जाधव यांनी १५ वर्षात अनेक कामे केली. मी आतापर्यंत अनेक खासदार बघितेले मात्र त्यात खा.प्रतापराव जाधव १ नंबरवर आहेत. छोट्या छोट्या कामांसाठीही लोक थेट खासदार साहेबांना फोन करतात मात्र खासदार साहेब प्रत्येकाचे फोन उचलून प्रश्न सोडवतात असे आ.कुटे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी खा.जाधव यांना पुन्हा एकदा दिल्लीत पाठवा. बूथ प्रमुखांनी मतदारांना मतपेटीपर्यंत आणा अशा सूचना यावेळी आ.कुटे यांनी केल्या. आ.गायकवाड यांनीही खा.प्रतापराव जाधव यांच्या रेकॉर्डब्रेक विजयासाठी झपाटून कामाला लागण्याचे आवाहन करीत बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून मोठा लीड देणार असल्याचे सांगितले.