'शासन आपल्या दारी' अभियानाचे आज आयोजन; हजारो लाभार्थ्यांना मिळणार आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते शासकीय योजनांचा थेट लाभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये राज्यातील भाजपा - शिवसेना महायुतीचे सरकार गतिमान प्रशासनावर भर देऊन लोकहिताची कामे करत आहे. या कामांचा थेट लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यादृष्टीने शासन आपल्या दारी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
अश्या आहेत योजना आणि एवढे आहेत लाभार्थी
या अभियानामध्ये जिल्हा ग्रामीण विकास योजनेअंतर्गत पी एम वाय योजनेतील ३४५ लाभार्थी, रमाई घरकुल योजनेचे १४९ लाभार्थी व नियमाकुल योजनेच्या ४२ लाभार्थ्यांसह पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ४९ शिक्षकांना देखील या कार्यक्रमात टॅबचे वितरण करण्यात येणार आहे. याशिवाय ' शाळेतील पहिले पाऊल ' या अंतर्गत ३८१८ विद्यार्थ्यांना पुस्तिकांचे वितरण केले जाईल. एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत ' माझी कन्या भाग्यश्री ' या योजनेद्वारे १४ मुलींना लाभ देण्यात येत असून मिनी दालमिल योजनेतील ११८ लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून वैयक्तिक शौचालय अनुदानाचे वाटप १४७ लाभार्थ्यांना करण्यात येईल. कृषी विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे १४, बिरसा मुंडा कृषी योजनेतील १ व कृषी परवाने वाटप योजनेतील ५ लाभार्थ्यांना देखील या कार्यक्रमात लाभान्वित करण्यात येत आहे. एन आर एल एस अंतर्गत ६०० बचत गटांना आर एफ वाटप याशिवाय ५०० महिला बचत गटांना बँक अर्थसाहाय्यांचे वितरण करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मातृवंदन योजनेच्या २८५ लाभार्थ्यांसह जननी सुरक्षा योजना १५१ लाभार्थी व मानव विकास निशन अंतर्गत बुडीत मजुरी योजनेतील २७१ लाभार्थ्यांना देखील लाभ देण्यात येईल. पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विशेष घटक म्हैस गट - २१ विशेष घटक शेळी गटांतर्गत ५ व वैरण विकास योजनेतील ७५ लाभार्थ्यांना या कार्यक्रमात लाभ दिला जाणार आहे. समाज कल्याण विभागांतर्गत तालुक्यातील ५० विद्यार्थ्यांना स्वावलंबन कार्डचे इथे वितरण होईल. संजय गांधी निराधार योजनेतील श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतून ११००, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील २९७, राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थसहाय योजनेतील १७ व पशुधन खरेदी अनुदान योजनेतील ५ लाभार्थ्यांना या कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष लाभ देण्यात येईल. नरेगा योजनेअंतर्गत १०० लाभार्यांना गोठे बांधण्यासाठी अनुदान यावेळी देण्यात येईल.
आ. श्वेताताई महाले यांचे आवाहन
गतिमान प्रशासनाच्या माध्यमातून लोक कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना योजना पद्धतीने मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ' शासन आपल्या दारी ' या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा लाभ तालुक्यातील जास्तीतजास्त पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा व या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी केले आहे.