जमलं बॉ! आज पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्यात; खूप दिवसापासून गायब होते, जिल्ह्यात बेपत्ता झाल्याचे पोस्टरही झळकले होते
गुलाबराव पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री असले तरी जिल्ह्याकडे त्यांचे फारसे लक्ष नसल्याचा आरोप होत असतो. पालकमंत्री झाल्यापासून जिल्ह्यात त्यांचे विशेष दौरे झाले नाहीत. याआधी केवळ त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यानंतर जिल्ह्यात अतिवृष्टी, अवकाळी असे एकावर एक संकट येऊनही पालकमंत्री जिल्ह्यात फिरकले नव्हते. त्यामुळे जिल्ह्यात पालकमंत्री बेपत्त्ता असल्याचे पोस्टर झळकले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने पालकमंत्री बेपत्ता झाल्याची तक्रारही दिली होती, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पालकमंत्र्यांना शोधून देणाऱ्या ५१ रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या पार्श्वभमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील आज जिल्ह्यात येणार आहेत.दुपारी अडीच वाजता बुलडाणा विश्रामगृहावर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात खरीप हंगाम पूर्वनियोजन बैठक ते घेणार आहेत. दुपारी ४ वाजता जिल्हा नियोजन समितीचा आढावा ते घेणार आहेत, त्यानंतर सायंकाळी पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. रात्री ते धरणगावकडे प्रयाण करतील.