GOOD NEWS नागपूर-गोवा एक्सप्रेस आता संतनगरी शेगावात थांबणार! खा. प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नाला मिळाले यश

 
jadhao

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विदर्भ आणि कोकणला जोडणाऱ्या नागपूर - मडगांव गोवा एक्सप्रेसला शेगाव येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. सदर मागणी मंजूर करण्यात झाली असून लवकरच शेगाव येथे गोवा एक्सप्रेसला थांबा देण्यात येणार आहे. यामुळे कोकणातील भाविकांचा दर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. तर विदर्भातील नागरिकांना कोकणात जाण्यास सुविधा झाल्याने नागरिकांत उत्साहाचे वातावरण आहे.

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावाची ख्याती जगभर आहे. शेगावात जगभरातून भाविक दर्शनासाठी येतात. देशातील कोकण परिसरातून देखील दरवर्षी शेकडो भाविक शेगाव येथे संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी येतात. मात्र, त्यांना प्रवास सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. अशातही विदर्भ आणि कोकण यांना जोडणारा मार्ग म्हणून गोवा एक्सप्रेसकडे पाहिले जात होते. सदर एक्सप्रेस ही नागपुर येथून मडगांव पर्यंत सुरु आहे. या रेल्वे मार्गाने नियमित शेकडो नागरिक नोकरी, कॉलेज या ठिकाणी ये-जा करतात. मात्र, या रेल्वेला शेगाव येथे थांबा नसल्याने भाविकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. 

सदर विषयाचे गांभीर्य ओळखून खा. प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सदर रेल्वेस शेगाव येथे थांबा देण्याची मागणी केली होती. त्या अनुशंगाने ०११३९ नागपूर - मडगांव ( गोवा एक्सप्रेस ), ०११४० मडगाव-नागपुर ( गोवा एक्सप्रेस) या गाडीला शेगाव रेल्वे स्थानकावर थांबा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे आता कोकणाला जाणाऱ्या नागरिकांना व कोकणातून शेगावीच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध झाल्याने भाविकात उत्साहाचे वातावरण आहे.