ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS ! किमान आधारभूत किंमत ज्वारी खरेदीला ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ;

८५ हजार क्विंटलचे अतिरीक्त उद्दीष्ठे मिळाले; केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचा यशस्वी पाठपुरावा....
 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): किमान आधारभूत खरेदी किमंत अंतर्गत ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देऊन ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे .केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी यासंदर्भात दिल्ली येथील पुरवठा विभागाकडे केलेल्या पाठ पुराव्याला यश आले असून वाढीव उद्दिष्ट देखील मिळाले आहे.
 केंद्र सरकारच्या वतीने किमान आधारभूत खरेदी हंगाम २०२३- २४ अंतर्गत ज्वारी खरेदीची अंतिम तारीख ही ३१ जुलै होती .त्यानंतर ज्वारी खरेदीची प्रक्रिया थांबविण्यात आली होती .अमरावती विभागाअंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अनेक ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांकडे ज्वारी तशीच पडून होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार होते. या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडे संपर्क साधून तारीख वाढवून मिळण्याबाबत विनंती केली होती.
शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नासंदर्भात ना जाधव यांनी दिल्ली येथील पुरवठा विभागाचे अवर सचिव मोहनलाल यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. अमरावती विभागातील शेतकऱ्यांच्या ज्वारी खरेदीला मुदतवाढ तसेच अतिरिक्त ज्वार खरेदीला मान्यता देण्यासंदर्भात सूचना केल्या. त्यानुसार महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना संदर्भातील पत्र केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आले आहे. त्यानुसार किमान आधारभूत खरेदी पणन हंगाम २०२३- २४ अंतर्गत ज्वारी खरेदीला ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यासाठी ८५ क्विंटल अतिरिक्त खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरा देण्यात आली आहे .त्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचा किमान आधारभूत खरेदीचा मार्ग खुला झाला आहे .
बुलढाणा जिल्ह्यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा....
रब्बी हंगाम २०२३ - २४ अंतर्गत बुलढाणा जिल्ह्याला दोन लक्ष ८३ हजार क्विंटलचे लक्ष देण्यात आले होते. त्यापैकी दोन लाख ७९७ क्विंटलची खरेदी झाली होती . तर ८१ हजार २०२ क्विंटलची खरेदी होणे बाकी होती. विशेष म्हणजे घाटाखालील जळगाव जामोद , संग्रामपूर , शेगाव , खामगाव या मोताळा या तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्वारी खरेदी संदर्भाची मागणी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडे केली होती. आता जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना अतिरिक्त ज्वारी खरेदीचा लाभ मिळणार आहे.