शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आता ट्रान्सफार्मर दुरुस्ती केंद्र! आ. संजय कुटेंच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचे उत्तर..!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ट्रान्सफार्मर दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना होत असलेला त्रास लक्षात घेता बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ट्रान्सफार्मर दुरुस्ती केंद्र सुरू करण्यात येतील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ मार्च रोजी एका प्रश्नाचे उत्तर देतांना जाहीर केले.
 
यासंदर्भात आ. डॉ. संजय कुटे यांनी चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वीज समस्या दूर करा अशी मागणी उचलून धरली होती. 

बुलडाणा जिल्ह्यात ट्रान्सफार्मर दुरुस्ती केंद्र फक्त दोनच असून या दोन दुरुस्ती केंद्रावर जिल्ह्यातील १३ तालुक्यातील शेतकरी अवलंबून आहेत. त्यामुळे ट्रांसफार्मर जळले तर ८-८ दिवस दुरुस्त होऊन मिळत नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागते. विहिरींना पाणी असूनही सिंचन कमी होत असल्याची बाब आ. कुटे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली होती.या समस्येचे उत्तर देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कौशल्य पूर्ण कारागीर उपलब्ध करण्याचा प्रयत्न सरकार करतच आहे.

कारागीर उपलब्ध झाल्यावर बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ट्रान्सफार्मर दुरुस्तीचे केंद्र सुरू करून यामुळे शेतकऱ्यांना जळलेली डीपी लवकरच दुरुस्त करून देता येईल. तसेच सौरऊर्जेची  व्यवस्था देखील शेतकऱ्यांना लवकरच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. सौर ऊर्जा जर शेतकऱ्यांना मिळाली तर याहीपेक्षा शेतकऱ्यांना सोयीचे होणार आहे, यासाठी एक बैठक लवकरच घेण्यात येणार असल्याचेही ना.फडणवीस म्हणाले.