जिल्हावासियांसाठी GOOD NEWS! खासदार प्रतापराव जाधवांनी अखेर जमवलंच; खामगाव जालना रेल्वेमार्गाचा प्रश्न निकाली; राज्य सरकारकडून ५० टक्के हिस्सा मंजुर; बुलडाण्यात फटाके फुटले..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यासाठी अखेर ती गोड बातमी आली आहे..अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला खामगाव जालना रेल्वेमार्गाचा विषय आता निकाली निघणार आहे. राज्य सरकारने द्यावयाचा असलेला ५० टक्के हिस्सा आज राज्य सरकारने मंजुर केल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. खासदार प्रतापराव जाधव यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनच्या लढ्याला यश मिळाल्याची भावना खा.जाधव यांनी बोलून दाखवली. बुलडाण्यात खा.प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयाबाहेर विविध पक्ष संघटनांच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
११४ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खामगाव जालना रेल्वेमार्गाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. खा.प्रतापराव जाधव यांनी याबाबत अनेकदा सभागृहात मागणी लावून धरली होती. त्यानुसार सर्वेक्षण झाल्यानंतर केंद्राने केंद्राचा ५० टक्के हिस्सा जाहीर केला होता. राज्य सरकारने ५० टक्के हिस्सा जाहीर करावा यासाठी खा.प्रतापराव जाधव यांनी वारंवार मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. काल खा. प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील आमदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. दरम्यान आज अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी खामगाव जालना रेल्वेमार्गासाठी ५० टक्के वाटा जाहीर केला आहे.