आमदार संजय रायमुलकरांच्या विरोधातील उपोषण खा. प्रतापराव जाधवांनी सोडवले! साब्रा येथील ग्रामपंचायत सदस्य गजानन वानखेडे बसले होते उपोषणाला;
आमदार रायमुलकरांनी जातीवरून शिवीगाळ करीत धमकावल्याचा केला होता आरोप...
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर तालुक्यातील साब्रा येथील ग्रामपंचायत सदस्य गजानन वानखेडे २५ ऑक्टोबर पासून आमरण उपोषणाला बसले होते. आमदार संजय रायमुलकर यांनी आपल्याला जातीवरून शिवीगाळ केली. ४ गुंड पाठवून आपल्याला मारहाण केली असा आरोप करीत वानखेडे आमदार रायमुलकर यांच्यावरील कारवाईसाठी उपोषणाला बसले होते. दरम्यान काल,चौथ्या दिवशी त्यांच्या उपोषणाची सांगता झाली.
आमदार संजय रायमुलकर यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे. ज्या ४ गुंडांना मारहाण करण्यासाठी पाठवले त्या चौघांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करावा यासह विविध मागण्या वानखेडे यांनी केल्या होत्या. बौद्ध समाजावरील अत्याचार थांबले पाहिजेत असेही वानखेडे यांनी म्हटले होते. अखेर काल, खा.जाधव, बौद्ध धर्मगुरू भंते काश्यप ली आणि मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिंगोटे यांनी वानखेडे यांची समजूत काढत उपोषण सोडण्याची विनंती केली. त्यानुसार गजानन वानखेडे यांनी उपोषण सोडले, मात्र आमदार रायमुलकर यांच्याविरोधातील मागण्यांवर त्यांना काय आश्वासन मिळाले हे कळू शकले नाही..!