कामे पूर्ण करा, संभाव्य पाणीटंचाई वर मात करा! आमदार श्वेताताईंनी घेतला मतदारसंघाचा आढावा! "हातणी" गावच्या समस्येवर लवकरच तोडगा काढण्याचा शब्द! नवनियुक्त सरपंचांचा केला सन्मान...

 
K
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देशाच्या ग्रामीण भागात जाणवणारी पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थिती पूर्णपणे दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जलजीवन मिशन या योजनेद्वारे कायापालट करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पनातून गाव खेड्यातील माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरवला जाणार असून गावे जलसमृद्ध करण्याचे उद्दिष्ट आपल्याला गाठायचे आहे. त्यासाठी जलजीवन मिशन योजनेची चिखली मतदारसंघात आपण प्रभावीपणे अंमलबजावणी करत असून प्रशासनाने सरपंच बंधू भगिनींनी या योजनेला सहकार्य करावे आणि ताबडतोब जलजीवन मिशनचे प्रस्तावीत कामे युद्ध स्तरावर पूर्ण करून घ्यावे असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी केले. यावर्षी तालुक्यात केवळ ६४ टक्के पाऊस पडल्यामुळे आगामी काळात तालुक्याला पाणीटंचाईची झळ जाणवू शकते, ही शक्यता गृहीत धरून सर्व उपाययोजना कराव्या असे त्या म्हणाल्या. दि ८ नोव्हेंबर रोजी शिवाजी सभागृहात आयोजित पंचायत समितीच्या पाणीटंचाई निवारण आढावा सभेच्या अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. 
चिखली तालुक्यातील पाणीटंचाईचा ग्रामनिहाय आढावा घेण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने आढावा सभेचे आयोजन आ. श्वेताताई महाले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. याप्रसंगी मंचावर उपविभागीय अधिकारी शिंदे, तहसीलदार सुरेश कव्हळे, गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे, पाणीपुरवठा विभागाचे चव्हाण, महावितरणचे वक्ते आदी शासकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, शिवसेना तालुकाध्यक्ष गजानन सिंह मोरे, प्रा. वीरेंद्र वानखेडे, संजय महाले, राजू जवंजाळ, संतोष काळे, सागर पुरोहित, सचिन पाटील, सरपंच संघटनेचे अध्यक्ष सतीश भुतेकर, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बी. एस. डोंगरदिवे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, राष्ट्रवादीचे शेखर बोंद्रे, पत्रकार सुधीर चेके पाटील, गोपाल तुपकर मंचावर उपस्थित होते. 
     उपाययोजना तातडीने करा - आ. महाले
             आपल्या अध्यक्षीय भाषणातून आ. श्वेताताई महाले यांनी जलजीवन मिशन योजनेचे महत्त्व विशद केले आणि या योजनेच्या कामांना गती मिळावी, विहीर अधिग्रहण, विंधन विहिरी, हातपंप व टँकरद्वारे पाणीपुरवठा आदी कामांचे प्रस्ताव देखील तातडीने मार्गी लावावे अशा सूचना केल्या. शिवाय गेल्यावर्षीच्या विहीर अधिग्रहणाचे मोबदला संबंधित शेतकऱ्यांना त्वरित चुकता करावा अशा सूचना पंचायत समिती व महसूल प्रशासनाला केल्या. याशिवाय हातनी गावच्या पाणी समस्येविषयी देखील लवकरच आपण बैठक बोलावणार असून त्यामध्ये या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी डिसेंबर महिन्यापासूनच पाणी समस्या पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलावी असे आवाहन आ. महाले यांनी आपल्या भाषणातून केले. 
           उपविभागीय अधिकारी शिंदे, तहसीलदार तहसीलदार सुरेश कव्हळे व गटविकास अधिकारी भारसाकळे यांनी देखील आपल्या भाषणातून प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या व ग्रामसेवक आणि सरपंच यांनी आपल्या गावातील पाणीटंचाई निवारणाचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आवाहन केले. 
नवनिर्वाचित सरपंचांचा केला आ. श्वेताताई महाले यांनी सत्कार
          तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेमधून निवडून आलेल्या सरपंचांचा सत्कार या सभेमध्ये आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये डोंगर शिवली येथील वैशाली सपकाळ, शेलगाव जहांगीर येथील अरुण सरनाईक, करणखेडचे रवींद्र इंगळे, अशोक इंगळे, मकरध्वज खंडाळा येथील उज्वला जाधव, मेरा खुर्द येथील रमेश अवचार, अंबाशी येथील वाहेद शेख, विश्वास हिवरकर व चांधई येथील सरपंच अनसूया सोळंकी यांच्यासह सरपंच संघटनेचे अध्यक्ष सतीश भुतेकर, उपाध्यक्ष प्रदीप सोळंकी, चेतन म्हस्के, कार्याध्यक्ष लता फोलाने यांचा देखील आमदार महाले यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. जीवन फुलझाडे यांनी या आढावा सभेचे सूत्रसंचालन केले. या सभेला चिखली तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.