गद्दारांना गाडण्यासाठी सज्ज व्हा! शिवसेना उबाठा चे लोकसभा समन्वयक राहुल चव्हाण यांचे बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात आवाहन; खा.प्रतापराव जाधवांचा घेतला खरपूस भाषेत समाचार!

म्हणाले, प्रतापराव.. गद्दारीचा टिळा पुसल्या जात नाही! सिंदखेडराजात पार पडला बूथ प्रमुखांचा मेळावा..
 
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):बुलडाणा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. इथल्या माणसांच्या रक्तात बाळासाहेबांचे विचार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्यभरात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्राच्या मातीला गद्दारी पसंत नाही. गद्दारांना महाराष्ट्राने कधीच माफ केले नाही, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ही परंपरा कायम ठेवत गद्दारांना घडण्यासाठी सज्ज व्हा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना मातीत लोळवा असे आवाहन शिवसेना (उबाठा) चे बुलडाणा लोकसभा समन्वयक राहुल चव्हाण यांनी केले. आज,५ मार्चला मातृतीर्थ सिंदखेडराजात आयोजित सिंदखेडराजा विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिकांच्या बूथ प्रमुख, शाखा प्रमुख व पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, सहसंपर्कप्रमुख छगन मेहेत्रे, सिंदखेडराजा ता. प्रमुख महेंद्र पाटील, देऊळगावराजा ता.प्रमुख दादाराव खार्डे यांच्यासह गावागावांतील शाखा प्रमुख, बूथ प्रमुख ,विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना राहुल चव्हाण यांनी खा.प्रतापराव जाधव यांच्यावर तोफ डागली. मिंधे गटाच्या खासदारांना स्वतःच्या पराभवाची चाहूल लागली आहे, तिकीट मिळेल की नाही याची त्यांना भीती आहे. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. निष्ठावान शिवसैनिकांना धमक्या देऊन, दादागिरी करून आपल्या बाजूने वळवण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. पण शिवसैनिक दादागिरी आणि धमक्या देणाऱ्यांना उरून पुरतात. प्रतापरावांना वाटत असेल की आता २ वर्षे होत आलीत त्यामुळे लोक गद्दारी विसरले असतील, पण प्रतापराव काहीही झाले तरी गद्दारीचा टिळा पुसल्या जात नाही असा घणाघात राहुल चव्हाण यांनी केला. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जोमाला तयारीला लागा, लोकसंपर्क वाढवा. आपल्या बूथ मधील मतदारांच्या भेटी गाठी वाढवा, तालुका आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी पायाला भिंगरी लागल्यासारखा प्रवास करा अशा सूचना राहुल चव्हाण यांनी केल्या.
  जिल्ह्यातील जनता शिवसेनेसोबत - नरेंद्र खेडेकर
जनता आता भूलथापांना बळी पडणार नाही. निवडणुका आल्या की खासदार गोड गोड बोलतात, वेगवेगळ्या योजनांचे आमिष दाखवतात मात्र साडेचार वर्षे ते गायब असतात. गद्दार हा शेवटी गद्दार असतो, निष्ठावान शिवसैनिक आता गद्दारांना धडा शिकवतील त्यासाठी शिवसेनेच्या बूथप्रमुख व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागण्याचे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी केले.