'लोकरथा'ची चाके फिरती राहावी म्हणून शेतकऱ्याकडून ५१ हजारांचा निधी! पाडळी येथील शेतकरी नेताजी पवार यांच्याकडून रविकांत तुपकरांच्या कार्याला आर्थिक बळ

 
gh
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची पिकविम्याची रक्कम आणि नुकसानभरपाई मिळावी, यासाठी रविकांत तुपकर यांनी ताकदीने लढा दिला. त्यांच्या लढ्याला यश आले आणि ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. यामुळे शेतकरी गावोगावी रविकांत तुपकर यांचा सत्कार करत आहेत. तालुक्यातील पाडळी येथे झालेल्या सत्कार सोहळ्यात प्रगतीशील शेतकरी नेताजी पवार यांनी रविकांत तुपकर यांचा 'लोकरथ' शेतकरी हितासाठी कायम फिरत राहावा म्हणून गाडीच्या इंधनासाठी ५१ हजारांचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी हा निधी रविकांत तुपकर यांच्याकडे सुपूर्द केला. ही आर्थिक मदत नसून शेतकऱ्यांचा आशिर्वाद म्हणून स्विकार करतो, असे म्हणत तुपकरांनी मोठ्या विनम्रपणे हा निधी स्विकारला.
 

बुलढाणा तालुक्यातील पाडळी गावात नुकताच शेतकऱ्यांनी रविकांत तुपकर यांचा नागरी सत्कार केला. यावेळी तेथील प्रगतीशील व जागरुक शेतकरी नेताजी पवार यांनी 'लोकरथा'च्या इंधनासाठी ५१ हजार रुपयांची घोषणा करून या शेतकरी नेत्याला फिरण्यासाठी बळ दिले. रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठ्या तळमळीने राज्यभर फिरतात, त्यांची फिरण्याची व्यवस्था व्हावी, या हेतुने नेताजीकाका व त्यांच्या पत्नीने ही घोषणा केली होती. केलेल्या घोषणेनुसार त्यांनी पाडळी येथील गावकऱ्यांना घेवून  तुपकरांच्या निवासस्थानी भेट देत, ५१ हजारांची रक्कम नगदी स्वरूपात दिली. हे केवळ पैसे नसून शेतकरी चळवळ बळकट करण्यासाठीचा हा आशिर्वाद आहे, म्हणून आपण ही रक्कम स्विकारतो असे म्हणत तुपकरांनी विनम्रपणे स्विकार केला. जिल्ह्यातील शेतकरी, मित्रपरिवार व कार्यकर्त्यांनी मागील वर्षी लोकवर्गणीतून 'इनोव्हा क्रिस्टा' गाडी भेट दिली होती, तिला लोकरथ म्हणून संबोधले जाते, या गाडीच्या डिझेलसाठी चिखलीतील मित्रपरिवाराने ५ लक्ष रुपये दिले होते. त्यावर 'लोकरथा'चा प्रवास चालू होता. त्यात नेताजी पवार यांनी ५१ हजार रुपयांची भर घातली आहे. नेताजीकाकांसारखी माणसे खऱ्याअर्थी चळवळीच्या रथात इंधन भरण्याचे काम करतात. त्यामुळे आंदोलनाला गती तर मिळणारच आहे, शिवाय आमच्या मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळाली आहे, असे भावनिक प्रतिपादन यावेळी रविकांत तुपकर यांनी केले. प्रामाणिकपणे काम करत गेलो आणि लोक साथ देत गेले. सच्चा मनाने राजकारणात, समाजकारणात काम केले की कोणाकडून बेईमानीचे दोन पैसे घेण्याची गरज भासत नाही. लोक आपणहून त्यांच्या भाकरीतला काढून तोडून देतात आणि तो पंचपक्वानाहून गोड असतो. आजवर मी चळवळीच्या कामासाठी शेतकऱ्यांनी व मित्रपरिवाराने कधीही कुठल्याच बाबतीत गैरसोय होऊ दिली नाही. त्यांच्या भरोश्यावरच आज राज्यभर ताकदीने फिरत आहे. शेतकऱ्यांचा हा आशिर्वाद यापुढेही शेतकरी चळवळीचे काम करण्यासाठी बळ देत राहील, असेही यावेळी रविकांत तुपकर यांनी सांगितले.