BIG BREAKING माजी आमदार रेखा खेडेकरांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी वर्णी! शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिले नियुक्तीपत्र

 
rk
चिखली (गणेश धुंदाळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार रेखा खेडेकरांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने रेखा खेडेकर यांना बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती दिली आहे.
 

 रेखा खेडेकरांनी भाजपकडून चिखली विधानसभेचे तीनदा प्रतिनिधित्व केले आहे. आमदार असताना २००९ ला पक्षाने त्यांना तिकीट नाकारले होते. २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्या तरी फारशा सक्रिय नव्हत्या. 
  
 अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत सहभागी करण्याचा  निर्णय घेतल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यात देखील दोन गट पडले आहेत. आधी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी देखील शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले होते. मात्र दोनच दिवसांत जिल्हा बँकेच्या हिताचे कारण सांगून त्यांनी अजित पवारांसोबत जायचा विचार सुरू असल्याचे सांगितले होते. 

काल, अजित पवारांनी बैठक घेऊन बुलडाणा जिल्हा बँकेला ३०० कोटी रुपयांचा सॉफ्ट लोनचा विषय जवळपास मार्गी लावण्याचा निर्णय घेतल्याने डॉ.राजेंद्र शिंगणे अजित पवारांसोबत असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बुलडाणा जिल्ह्याची धुरा कुणाकडे जाणार याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. त्यावर आज रेखा खेडेकरांच्या नियुक्तीनंतर शिक्कामोर्तब झाले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रेखा खेडेकर यांना नियुक्तीपत्र दिले आहे. बुलडाणा लाइव्ह ने त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर राहील असे त्या म्हणाल्या. रेखा खेडेकर बुलडाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या महिला जिल्हाध्यक्ष आहेत विशेष म्हणजे याआधी त्यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली आहे.