माजी आमदार हर्षवर्धन सपकळांचे आमदार संजय गायकवाडांना ओपन चॅलेंज! म्हणाले, असेल हिम्मत तर मोज किंमत!...तर मी राजकीय सन्यास घेतो म्हणाले!तुम्ही फक्त...

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलडाण्याचे राजकारण चांगलेच पेटले आहे. आमदार संजय गायकवाड आणि माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यात वाकयुद्ध पेटले आहे. आमदार गायकवाड यांची गाडी पोलीस कर्मचारी धूत असल्याचा व्हिडिओ हर्षवर्धन सपकाळ यांनी व्हायरल केल्यानंतर आमदार गायकवाड व त्यांचे समर्थक चांगलेच खवळल्याचे दिसले.

त्यानंतर पुन्हा हर्षवर्धन सपकाळ यांनी आमदार गायकवाड यांच्या कार्यालयाला अड्डा संबोधले. बुलडाण्यात विकासकामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला. तिकडून गायकवाड समर्थकांकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरही गंभीर आरोप सोशल मीडियातून करण्यात आले. हर्षवर्धन सपकाळ यांचा मुंबईतील नरिमन पॉईंट येथे १०० कोटींचा फ्लॅट असल्याचा दावा आ.गायकवाड समर्थकांकडून व्हायरल करण्यात येत असलेल्या पोस्ट मध्ये करण्यात आला. आता त्यावर हर्षवर्धन सपकाळ कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी आ. गायकवाड यांना खुले चॅलेंज दिले आहे. "असेल हिंमत तर मोज किंमत" या शीर्षकाखाली सपकाळ यांनी एक पोस्ट फेसबुकवर लिहिली आहे.

तीन दिवसांत मुंबईतील माझ्या तथाकथित फ्लॅटचे शासकीय दस्तावेज सादर करा. माझा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे थोडाही संबंध असला तर मी राजकीय जीवनातून संन्यास घेतो. त्या फ्लॅटच्या चाव्या तुम्हाला देतो, तुमच्या नावावर करून देतो असे ओपन चॅलेंज माजी आमदार सपकाळ यांनी दिले आहे. एवढ्यावर सपकाळ थांबले नाहीत. वाघजाळ फाट्यावरील फार्महाऊस, शेतजमिनीवरून देखील सपकाळ यांनी आ.गायकवाड यांना छेडले आहे.
"तुम्ही तीन दिवसांत मुंबईतील माझ्या तथाकथित फ्लॅटचे शासकीय दस्तावेज सादर करा. ते केले नाही तर वाघजाळ फाट्यालगत आमदार निधीतून झालेला काँक्रिट रस्ता असलेला टुमदार बंगला व शेत जमीन जी तुम्ही एका महिलेकडून बळकावली आहे. हायकोर्टाने आपल्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील देले आहेत, ती संपूर्ण जमीन मूळ मालक असलेल्या लाडक्या बहिणीला परत करावी" असे चॅलेंज माजी आ.सपकाळ यांनी आ.गायकवाड यांना दिले आहे. 
घाबरगुंडी उडणे स्वाभाविकच...
बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील भ्रष्टाचाराचे मुद्दे, अवैध धंदे , गुंडागर्दी हे मुद्दे समोर आणत असल्यामुळे विद्यमान आमदारांची चांगलीच पंचाईत झालेली आहे. आपण घेत असलेल्या संवाद मिळाव्यांना मोठ्या संख्येने व उत्साहाने प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे त्यांची घाबरगुंडी उडणे स्वाभाविकच आहे असा चिमटाही माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी आमदार गायकवाडांना काढला आहे.