बुलडाण्याच्या माजी खासदारांचा गेम झाला; तिकीट कटल! म्हणाले, तरीही मी उभा राहणारच...

 
अमरावती
अमरावती(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती. मात्र तिथे भाजपने नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या या निर्णयाने आनंदराव अडसूळ प्रचंड नाराज झाले आहेत.
बुलडाणा लोकसभा मतदारसंघ राखीव होता तेव्हा तब्बल ३ वेळा आनंदराव अडसूळ शिवसेनेकडून विजयी झाले होते. बुलडाणा लोकसभा मतदारसंघ खुला झाल्यानंतर आनंदराव अडसूळ यांनी राखीव झालेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत दिल्ली गाठली होती. मागील लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी अडसूळ यांचा पराभव केला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अडसूळ यांनी एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.अमरावती लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा सांगितला होता, मात्र भाजपने आज थेट यादी जाहीर करून नवनीत राणा यांना उमेदवार बनवले आहे. दरम्यान माध्यमांशी बोलताना आनंदराव अडसूळ यांनी नाराजी व्यक्त केली. "चर्चा सुरू असताना भाजपने एकतर्फी उमेदवारी घोषित केली. नवनीत राणा यांना मतदारसंघात प्रचंड विरोध आहे, ही राजकीय आत्महत्या आहे. सगळे नेते नवनीत राणा यांच्या विरोधात आहे. काहीही झाले तरी आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत" असे आनंदराव अडसूळ यांनी म्हटले आहे.