खतांची दरवाढ झाल्यास वन बुलढाणा मिशन छेडणार आंदोलन! जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांना एकाचवेळी निवेदन

 
बुलढा
बुलढाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आगामी खरीप हंगामाकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक खते व बियाणे उपलब्ध करण्यासह रासायनिक खतांची दरवाढ रोखण्यात यावी. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वन बुलढाणा मिशनच्यावतीने देण्यात आला आहे. याबाबत ६ मे रोजी जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांना एकाच वेळी निवेदन देण्यात आले.
खरीप हंगाम महिन्याभरावर येऊन ठेपला आहे. तत्पूर्वी प्रशासनाने खरीपपूर्व बैठका व नियोजन करणे गरजेचे आहे. म्हणजे ऐनवेळी धावपळ आणि गैरसोय होणार नाही. शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार व मुबलक खते, बियाणे उपलब्ध झाली पाहिजेत. तसेच खतांच्या किंमती वाढवण्याऐवजी रास्त दरात शेतकऱ्यांना खते मिळायला हवीत. सध्या रासायनिक खतांच्या किंमती भरमसाठ वाढलेल्या आहेत. तर दुसरीकडे मालाचे भाव जैसे थे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे व खत विकत घेणे परवडत नाही. सरकारने खत दरवाढीचा पुनर्विचार करावा.
दरवर्षी आपण पाहतो की, खतांचा तुटवडा जाणवतो. कुठे बोगस बियाण्याविरोधात आवई उठते. अशी परिस्थिती उदभवण्याआधीच खबरदारी घेतल्यास सोयीचे होईल. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकरी बांधवांची आर्थिक व मानसिक लुट झाल्याचा मागील वर्षीचा अनुभव आहे. मोठ्या संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता. यावर्षी त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून उपाययोजना आखण्याची गरज आहे. गतवर्षी नफेखोर व्यापाऱ्यांनी बोगस बियाणे वापरून अनेक शेतकऱ्यांची लुट केली होती. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ आमच्या शेतकरी बांधवांवर आली होती. यावर्षी तशी परिस्थिती निर्माण होऊ नये. तसेच रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ करु नये. गतवर्षीच्या किंमतीतच शेतकऱ्यांना खते उपलब्ध करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देतांना दत्तात्रय नारायण सावळे,
कैलास भीमराव इंगळे, ज्ञानेश्वर विनायक पाटील , दिलीपराव साहेबराव पाटील, गणेश शेनफड काटे ,दत्तात्रय नारायण जाधव, रामू इंदर्सिंग राजपूत उपस्थित होते.