रब्बीसाठी पूर्ण वेळ विज, जळालेले रोहित्रे तात्काळ द्या;अन्यथा.. महावितरणचे कार्यालय जागेवर ठेवणार नाही! रविकांत तुपकरांचा इशारा!एल्गार रथयात्रेला मेहकर-लोणार तालुक्यात प्रतिसाद

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी आधीच संकटात आहेत आणि त्यातच वीज वितरण कंपनीकडून वीजेचा लपंडाव खेळला जात असल्याने शेतकऱ्यांच्या संकटात अधिक भर पडली आहे. रब्बीसाठी पूर्ण वेळ वीज द्यावी तसेच नादुरुस्त रोहीत्र ताडीने बदलून द्यावे, अन्यथा महावितरणचे कार्यालय जागेवर ठेवणार नाही, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. रविकांत तुपकरांची एल्गार रथयात्रा सध्या मेहकर-लोणार तालुक्यात आहे, या यात्रेदरम्यान आयोजित सभेत तुपकरांनी सदरचा इशारा दिला.
 

ss

                                  जाहिरात👆

सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी आंदोलन हाती घेतले आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यात एल्गार रथयात्रा सुरु आहे. सदर यात्रा चौथ्या दिवशी मेहकर तालुक्यातील जनुना, विठ्ठलवाडी, पांगरखेड, गोहगाव दांदडे, डोणगाव, खंडाळा, अंत्री देशमुख, चिंचोली बोरे व लोणार तालुक्यातील सुलतानपूर, रांजनी, जांबुल, मांडवा आदी गावांमध्ये पोहचली आहे. या यात्रेला शेतकरी, शेतमजूर, तरुणांचा उत्साही प्रतिसाद दिसून आला. दरम्यान आयोजित सभेत रविकांत तुपकर यांनी सांगितले की, खरिप हंगामात पावसात खंड पडल्याने तसेच यलो मोझॅक व बोंड अळीमुळे सोयाबीन-कापसाच्या उत्पन्नात प्रचंड घट झाली आहे.


   शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च देखील निघणे अशक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बीपासून थोडीफार आशा आहे, मात्र वीज वितरण कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे खरीपाप्रमाणेच रब्बीतील पिकांचीही नासाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे थोडेफार पाणी आहे, ते शेतकरी हरभरा, गहू, तूर ही पिके जगविण्याची धडपड करीत आहे परंतु पिकांना पाणी देण्यासाठी विजेची अडचण येत आहे. विज वितरण कंपनीने नादुरुस्त रोहित्र तातडीने दुरुस्त करुन द्यावे तसेच रब्बी हंगामासाठी पूर्ण वेळ वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली असून वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना वेठीस धरल्यास कंपनीला धडा शिकवू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.