रविकांत तुपकरांसाठी अंगावर डिझेल ओतून घेतले, जमिनीत गाडून घेतले! शेतकरी आंदोलनात तुपकरांसोबत कारावासही भोगला! आज आमदार संजय गायकवाडांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला;

शेख रफिक यांनी असं का केलं असेल?

 
Fgbbb
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वाभिमानीच्या प्रत्येक आंदोलनात अग्रभागी दिसणारे शेख रफिक यांनी आज आमदार संजय गायकवाडांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या १६ वर्षांपासून ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेत रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात काम करीत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष पद देखील त्यांनी भूषवले होते.
रविकांत तुपकर यांनी सोयाबीन भाववाढीसाठी अन्नत्याग आंदोलन केले त्यावेळी या आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी म्हणून शेख रफिक यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय रविकांत तुपकर यांच्यासोबत एका आंदोलनात त्यांनी जमिनीत गाडून घेतले होते. काही महिंन्याआधी झालेल्या आंदोलनात शेख रफिक यांनी रविकांत तुपकर यांच्यासोबत अकोला कारागृहात कारावास देखील भोगला होता. रविकांत तुपकर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या शेख रफिक यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश का केला असेल? एकाएकी असे काय झाले असेल असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
  
शेख रफिक म्हणाले...
माझ्याकडे गुंठाभर जमीन नव्हती तरी मी १६ वर्षे चळवळीत प्रामाणिक पणे काम केले. मात्र आता तिथे थांबावेसे वाटत नव्हते. मी आधीच राजीनामा दिला होता मात्र रविभाऊंची आणि माझी भेट झाली नाही, त्यांचा फोन आला नाही. कदाचित त्यांना माझी गरज नसेल..त्यामुळे काहीतरी निर्णय घेण्याची इच्छा मनातून होती. आमदार संजय गायकवाड ज्या पद्धतीने सर्व धर्मीय समाजबांधवांच्या विकासासाठी झटत आहेत ते पाहून त्यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी शिवसैनिक झाल्याचे शेख रफिक म्हणाले. ज्यांच्यासोबत १६ वर्षे राहिलो त्यांच्यावर आपल्याला कोणतीही टीका करायची नाही असेही शेख रफिक म्हणाले.