आधी लगीन लोकशाहीचं! वरात काढण्याआधी वऱ्हाड निघाले मतदानाला! पिंपळगाव बु, च्या विकास गीते अन् बोरखेडी बावरीच्या संतोष शेरेने घालून दिला आदर्श..

 
Nbb
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) लोकशाहीचे मोठे पर्व म्हणजे लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक.  आज २६ एप्रिलला  बुलढाणा लोकसभा मतदार संघात मतदानोत्सव सुरू आहे. देशाचे भवितव्य घडवणारी ही निवडणूक असून नागरीक मतदानरुपी कर्तव्य बजावत आहेत. आज लग्नाची देखील दाट तारीख आहे, ठिकठिकाणी लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी लग्नाआधी लोकशाहीचे लग्न लावण्यासाठी, देश हितासाठी नवदांपत्य प्राधान्य देत आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात देखील दोघा नवरदेवांनी आधी मतदानाचे कर्तव्य पार पाडले त्यानंतरच लग्नाची वरात काढली. अशी अभिमानास्पद  कामगिरी केली आहे देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळगाव बु येथील विकास गजानन गीते आणि बोरखेडी बावरीच्या संतोष शेरे यांनी. 

 विकास गीते याचा विवाह सोहळा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी   येथे सायंकाळी संपन्न होत आहे. तत्पूर्वी वऱ्हाड निघण्याआधीच  विकासने आपल्या गावी पिंपळगाव बु येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. त्याच्यासह वऱ्हाडात सहभागी असलेल्या नातेवाईकांनीही मतदान करून कर्तव्य पार पाडले. तर दुसरीकडे देऊळगाव राजा तालुक्यातीलच बोरखेडी बावरा येथील संतोष शेरे  याचा विवाह भोकरदन तालुक्यातील नळणी खुर्द गावात होणार आहे. त्याआधी संतोषने गावातील मतदान केंद्रात मतदान केले. दोघांच्याही भूमिकेने देशप्रेमाचा प्रत्यय पाहायला मिळाला. देऊळगाव राजा तालुक्यातील परिसरात दोघा नवरदेवांचे भरभरून कौतुक होत आहे.