बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून जालिंधर बुधवतांना उमेदवारी द्या! त्यांनीच जिल्ह्यात शिवसेना जिवंत ठेवली ;शिवसैनिकांची संजय राऊतांकडे आग्रही मागणी...
Aug 14, 2024, 12:19 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना नेते संजय राऊत काल बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. शेगाव येथे जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेत त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. दरम्यान यावेळी बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचाही आढावा राऊत यांनी घेतला. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांना उमेदवारी देण्यात यावी असा आग्रह यावेळी शिवसैनिकांनी खा. राऊत यांच्याकडे धरला.
शिवसेनेत फूट झाली, गद्दार खोके घेऊन पळाले, त्यावेळी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांनीच जिल्हा शिवसेनेचा किल्ला लढवला. खासदार,आमदार शिंदे गटात गेले तरीही बुधवंत यांनी कार्यकर्त्यांची मोट बांधून ठेवली. बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी आमदारांना चारी मुंड्या चित केले. त्यामुळे बुलडाणा विधानसभेची उमेदवारी बुधवंत यांना देण्यात यावी असा आग्रह शिवसैनिकांनी खासदार संजय राऊत यांच्याकडे धरला. बुलडाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची जबरदस्त संघटन बांधणी बुधवंत यांच्या नेतृत्वात झाली आहे.त्यामुळे बुधवंत यांच्या विजयाची जबाबदारी आमची,तुम्ही फक्त उमेदवारी द्या असेही शिवसैनिक खा.संजय राऊत यांना म्हणाले. त्यावर बुधवंत यांचे काम चांगले आहेच, योग्य तोच निर्णय होईल असा शब्द संजय राऊत यांनी दिला.