२० नोव्हेंबरला बुलढाण्यात धडकणार शेतकऱ्यांचे वादळ! रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात एल्गार महामोर्चा; गावागावातील बळीराजाची फौज एकत्र येणार

 
Fgbn
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी जिल्हाभरातील शेतकरी, शेतमजूर, तरुणांची फौज एकवटली आहे. शेतकऱ्यांचे हे वादळ , 20 नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात धडकणार आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात भव्य ‘एल्गार महामोर्चा’ जिल्हाधिकारी कार्यालयावर चालून जाणार आहे. या महामोर्चासाठी गावगाड्यातील शेतकऱ्यांसह शहरातील नागरिक देखील एकवटले आहेत. त्यामुळे हा महामोर्चा लक्षवेधीत नव्हे तर सरकारला धडकी भरवणारा ठरणार असल्याचे दिसून येत आहे.
सोयाबीन कापूस - उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. या लढ्याचा पहिला टप्पा म्हणजे ‘एल्गार महामोर्चा’ आहे. या महामोर्चाची गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची सद्बुद्धी दे अशी प्रार्थना करत संत गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ५ नोव्हेंबर रोजी रथयात्रेचा दणक्यात श्रीगणेशा केला होता. त्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासह शेतकरी, शेतमजूर, तरुणांची मोठी फौज उभी करत रविकांत तुपकर यांनी गाव खेडे पिंजून काढले आहेत. गावोगावी या रथयात्रेला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. स्वतःच्या खर्चाने आणि स्वयंस्फुर्तिने या महामोर्चात सहभागी होण्याचे वचन देत गावोगावी शेतकरी रविकांत तुपकरांच्या पाठीशी उभे राहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे हे प्रचंड मोठे वादळ उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहे. बुलढाणा शहरातील जिजामाता व्यापारी क्रीडा संकुल येथून दुपारी १२ वाजता या महामोर्चाची सुरुवात होणार आहे. शहरातील मुख्य मार्गाने फिरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल त्यानंतर तेथे या मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन रविकांत तुपकरांची तॊफ धडाडणार आहे.
अराजकीय आंदोलन जनआंदोलन होणार...
सोयाबीन - कापसाला दरवाढ मिळावी तसेच येलो मोझॅक, बोंडअळीमुळे व पावसात खंड पडल्याने सोयाबीन - कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी १० हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई मिळावी, पिकविमा व शेतकरी, शेतमजूर, तरुण, महिला बचत गट, तरुणांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हा महामोर्चा निघणार आहे. केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी हा लढा आहे. त्यामुळे कोणतेही पक्ष, संघटना व राजकारण बाजूला ठेवून या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.
 तुपकरांच्या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष
 या महामोर्चात शेतकरी नेते रविकांत तुपकर पुढील राज्यव्यापी आंदोलनाची नेमकी काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यापूर्वीची रविकांत तुपकरांची आंदोलने आक्रमक राहिली आहेत. दोन वर्षांपूर्वीचे अन्नत्याग आंदोलन राज्यभर चांगलेच पेटले होते तर गेल्या वर्षी थेट मुंबईतील अरबी समुद्रातील जलसमाधी आंदोलनाने राज्यभरातील पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली होती.व सरकार हादरले होते.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी चर्चेला बोलावून राज्य शासनाच्या आधारित असलेल्या बहुतांश मागण्या पूर्ण केल्या होत्या. तर आत्मदहन आंदोलनामुळे तुपकरांना व सहकाऱ्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. तुपकरांच्या आंदोलनांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीकविमा, नुकसानभरपाई, सततच्या पावसाची नुकसानभरपाई मिळाली, शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे यावर्षी रविकांत तुपकर नेमकी कोणत्या आक्रमक आंदोलनाची घोषणा करतात याकडे राज्यातील सर्वांचेच लक्ष लागून आहे.