लाखभर रुपये घेऊन नाशिक जिल्ह्यातील शेतकरी रविकांत तुपकरांच्या भेटीला!म्हणाले, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही महाराष्ट्राचा आवाज आहात

 
Ghhh
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सर्वसामान्य जनतेचा उमेदवार म्हणून रविकांत तुपकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील रुई येथील शेतकऱ्यांनी रविकांत तुपकरांना लोकसभा निवडणुकीसाठी आर्थिक मदत म्हणून एक लाख रुपये आणून दिले आहेत. ही मदत केवळ रुई या गावातील शेतकऱ्यांची असून नाशिक जिल्ह्यातील इतर गावांमधून देखील कार्यकर्ते व शेतकरी आर्थिक मदतीसह प्रचारासाठी देखील पुन्हा दाखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बुलडाणा जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता अगदी तन-मन -धनाने रविकांत तुपकरांच्या पाठीशी आहे. गावो गावी रविकांत तुपकर यांना भरघोस पाठिंबा आणि समर्थन मिळत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणचे सर्वसामान्य कार्यकर्ते निवडणुकीसाठी मदत म्हणून लोकनिधी देखील देत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातीलच नव्हे तर आता राज्यातील इतर जिल्ह्यामधून देखील त्यांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. जनशक्ती विरुद्ध धनशक्तीच्या या लढ्यात आपलाही खारीचा वाटा असावा या हेतूने अनेक जण शक्य ती मदत घेऊन पोहोचत आहेत.
दरम्यान काल शनिवारी रविकांत तुपकर भेटीगाठीसाठी खामगाव तालुक्यात असताना नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील रुई गावातील शेतकरी थेट तेथे भेटण्यासाठी पोहोचले. "तुम्ही बुलढाणा लोकसभेचे उमेदवार असला तरी तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी सर्वसामान्य जनतेचा आवाज आहात त्यामुळे आम्ही आमची छोटीशी मदत तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत." असे सांगत त्यांनी रविकांत तुपकरांच्या हाती एक लाख रुपयांचा निधी ठेवला. "ही मदत तुटपुंजी आहे याची आम्हाला जाणीव आहे परंतु आमच्या परीने होईल तेवढी मदत आम्ही देत आहोत. ही मदत एकट्या गावातील असून इतर गावातील कार्यकर्ते आणि शेतकरी देखील त्यांची मदत घेऊन आणि प्रत्यक्ष प्रचारासाठी सहकार्य करण्यासाठी लवकरच दाखल होणार आहेत." असे देखील यावेळी त्यांनी सांगितले. याप्रसंगी रविकांत तुपकर आहे भावनिक झाले होते. बुलडाणा जिल्ह्यासह राज्यभरातून मिळत असलेल्या सर्वसामान्यांच्या या प्रेमाची परतफेड होऊ शकणार नाही. सर्वसामान्यांचे हे प्रेम आणि आपुलकी व आशीर्वादच आता इतिहास घडवेल असे यावेळी रविकांत तुपकर यांनी सांगितले.