महावितरणामुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले दुहेरी संकट ! लोड शेडिंग थांबवा अन्यथा परिणामांना सामोरे जा! उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सज्जड इशारा.

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पावसाने दिलेली ओढ आणि पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची सुरू असलेली धडपड त्यातही महावितरणाने लोड शेडिंग च्या नावाखाली शेतकऱ्यांची चालवलेली थट्टा यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. महावितरणामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट निर्माण झाले असून लोड शेडिंग न थांबवल्यास महावितरणाने परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा सज्ज इशारा जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर व जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात शिवसेनेने दिला आहे. 
 आज शिवसेनेने महावितरणाच्या अधीक्षक अभियंता यांना आपल्या मागण्याचे निवेदन सादर केले. यात नमूद आहे की, बुलडाणा जिल्ह्यात घाटावर आणि घाटाखाली पावसाने वेगवेगळे स्वरूप यंदा दाखवले आहेत. घाटाखाली महापुराने दैना उडवली तर घाटावर दमदार पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. महावितरण कडून लोड शेडिंग च्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बंद आहेत. पीक परिस्थिती दुष्काळाची असल्याकारणाने आणि त्यात ऑगस्ट पूर्णतः कोरडा गेला. सप्टेंबर मध्ये देखील पावसाची शाश्वती कमी -अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे आहेत. उपलब्ध पाण्याच्या स्त्रोतातून पीक जगवण्याचा आटापिटा मायबाप शेतकरी करत आहेत. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांकडून पाण्याचा उपसा वाढला आहे. महावितरण कडून लोड शेडिंग च्या नावाखाली शेतकऱ्यांना मोठा त्रास होतोय. 
लोड शेडिंग संपल्यानंतरही पूर्ण क्षमतेने वीज मिळत नाही. होल्टेज नसल्याने कृषी पंप चालत नाहीत.त्यामुळे शेतकरी वैतागले आहेत. तळहाताच्या फोड़ा प्रमाणे जपलेली पिकं करपत असताना ते काहीच करू शकत नाहीत अशी स्थिती महावितरणमुळे निर्माण झाली असून शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. लोड शेडिंग ची वेळ जाहीर करून त्यानंतर किमान पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा शेतकऱ्यांना व्हावा. लोड शेडिंग करण्याची वेळच का येते हे समजायला मार्ग नाही. महानगरांमध्ये होल्डिंग वर लावण्यासाठी विज पुरवठा होतो. कृषिप्रधान आपल्या देशात ज्या शेतीच्या भरोशावर मोठी अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्या शेतकऱ्यांना मात्र पूर्ण क्षमतेने वीज मिळत नाही. त्यांना आणखी अडचणीत आणल्या जाते. याबाबत तीव्र असंतोषाची भावना ग्रामीण भागामध्ये आहे. महावितरणाने आपला कारभार सुधारून पूर्ण वेळ व पूर्ण क्षमतेने विज द्यावी नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी प्रा सदानंद माळी, तालुका प्रमुख लखन गाडेकर, विधानसभा संघटक अशोक इंगळे, मा पंचायत समिती सभापती सुधाकर आघाव, महिला आघाडीच्या डॉ नंदिनी रिंढे, वर्षा सोनुने, किसान सेना उप जिल्हा प्रमुख गजानन उबरहंडे, उप तालुका प्रमुख अशोक गव्हाणे, विजय इतवारे, एकनाथ कोरडे, युवासेनेचे मोहन निमरोट, राहुल जाधव, गजानन चौधरी, बी टी म्हस्के , बंटी कपूर, सुधाकर मुंढे, विजय भोसले, मंगेश चव्हाण, किरण दराडे, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.